गोरेवाड्यात आणले वाघ, बिबट आणि अस्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 09:27 PM2020-11-24T21:27:00+5:302020-11-24T21:28:11+5:30
Gorewada , Tigers, leopard and bears brought nagpur news गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय सुरू करण्याच्या हालचाली वेगाने चालल्या आहेत. शुक्रवारी राजकुमार वाघाला स्थानांतरित केल्यानंतर आता पुन्हा एक वाघिणीसह सात बिबटे आणि सहा अस्वल नव्या प्राणिसंग्रहालयात स्थानंतारित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय सुरू करण्याच्या हालचाली वेगाने चालल्या आहेत. शुक्रवारी राजकुमार वाघाला स्थानांतरित केल्यानंतर आता पुन्हा एक वाघिणीसह सात बिबटे आणि सहा अस्वल नव्या प्राणिसंग्रहालयात स्थानंतारित करण्यात आले.
हे सर्व प्राणी गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये वास्तव्यास होते. प्राणी हलविण्याचे काम सहा दिवस चालले. मानद वन्यजीव संरक्षक कुंदन हाते यांच्या मार्गदर्शनात ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी प्राण्यांच्या स्थानंतरणात महत्वाची भूमिका बजावली. सुरुवातीला राजकुमार या वाघाला यशस्वीपणे प्राणिसंग्रहालयात आणण्यात आले. त्यानंतर एका वाघिणीला स्थानांतरित करण्यात आले.
पुढे दोन नर आणि पाच माद्यांसह सात बिबट आणि सहा अस्वलाना यशस्वीपणे स्थानांतरित करण्यात आले. हे काम अतिशय कठीण होते. मात्र ट्रान्झिटच्या अनुभवी कर्मचाऱ्यांनी अतिशय हुशारीने या प्राण्यांना हलविले.
गोरेवाडा प्रशासनाने सर्व पत्रव्यवहार पूर्ण करून ट्रान्झिट सेंटरच्या टीमला मदतीची मागणी केली. त्यानुसार येथील पिंजरे, रेस्क्यू करणारी गाडी, डॉक्टर आणि अनुभवी लोकांची मदत घेण्यात आली. एक एक करून सहा दिवसात सर्व प्राणी गोरेवाड्यात हलविण्यात आले. यानंतर हरीण व इतर प्राणी हळूहळू आणण्यात येणार आहेत. डिसेंबर ते पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत हे आंतराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय सुरू होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.