वाघांचे नैसर्गिक भ्रमणमार्ग धोक्यात : नवीन अधिवासाच्या शोधात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 08:59 PM2020-01-27T20:59:47+5:302020-01-27T21:02:38+5:30
विदर्भातील जंगलांमध्ये वाघांची संख्या वाढली. त्यांच्या अधिवासासाठी जंगल अपुरे पडायला लागल्याने वाघ नवीन अधिवासाच्या शोधात आहेत. यामुळे नवा अधिवास शोधणारे वाघ वनसीमा ओलांडून शेतशिवाराच्या मार्गाने लगतचे जंगल गाठत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील जंगलांमध्येवाघांची संख्या वाढली. त्यांच्या अधिवासासाठी जंगल अपुरे पडायला लागल्याने वाघ नवीन अधिवासाच्या शोधात आहेत. यामुळे नवा अधिवास शोधणारे वाघ वनसीमा ओलांडून शेतशिवाराच्या मार्गाने लगतचे जंगल गाठत आहेत. भंडारा जिल्ह्यातील बपेरा येथील शेतशिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यामुळे अशाप्रकारची शक्यता आता वन्यजीव अभ्यासक व्यक्त करीत आहेत.
तीन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील बिनाखी या गावालगतच्या शेतशिवारात आलेल्या वाघाच्या हल्ल्यात गावकरी जखमी झाले. प्रत्यक्षात या गावाला लागून जंगल नाही. त्यामुळे या गावच्या शेतशिवारात वाघ येईल, याची सूतराम कल्पना कुणालाच नव्हती. मात्र शेतशिवारावर वाघ आल्याचे कळल्यावर गावकऱ्यांंनी गर्दी केली. वाघाला हुसकावून लावण्यासाठी काठ्या, दगडधोंडे फेकून मारले. त्यामुळे बिथरलेल्या वाघाने गर्दीवर हल्ला केला.
हे गाव मात्र पूर्वेला असलेल्या न्यू नागझिरा वाईल्डलाईफ सेंच्युरी आणि पश्चिमेला असलेल्या पेंच नॅशनल पार्क या दोन जंगलांच्या मध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. या भागातील वाघांचे नैसर्गिक कॉरिडॉर (भ्रमणमार्ग) जवळपास नष्ट झालेले आहेत. पेंच आणि न्यू नागझिरामध्ये वाघांची संख्या बºयापैकी आहे. भंडारा विभागात मागील वर्षी सात वाघांची नोंद झाली आहे. वाढलेले नर वाघ आपला नवा अधिवास शोधण्यासाठी बाहेर पडतात. दोन जंगलांना लागून असलेल्या झाडीतून मार्ग काढत वाघ आपल्या पुढच्या नियोजित जंगलात पोहचतात. मात्र जंगलांना जोडणाºया वृक्षांची आणि झाडांची तोड झाल्याने वाघांचे भ्रमणमार्ग बाधित झाले आहेत. परिणामत: वाघांना मार्ग शोधण्यासाठी शेतशिवारांचा वापर करावा लागत आहे.
वाघ शोधताहेत नवे भ्रमणमार्ग
वाघ नवे भ्रमणमार्ग शोधत असल्याने अलीकडे जंगल नसलेल्या परिसरातही ते आढळायला लागल्याच्या घटना घडल्या आहेत. नागपूरलगतच्या बुटीबोरी परिसरात व लगतच्या पाच-सहा गावांच्या शेतशिवारात दोन महिन्यांपूर्वी वाघ आढळला होता. सुमारे महिनाभरापूर्वी माजरी (चंद्रपूर) जवळ असलेल्या वर्धा नदीच्या पात्रात पडलेल्या वाघाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाला होता. हा परिसर जंगलापासून बराच लांब आहे. दोन वर्षापूर्वी भद्रावती तालुक्यातील नंदोरी (जि. चंद्रपूर) येथील शेतशिवारात आलेल्या वाघाने एका युवकाला जखमी के ले होते. हे शेतशिवारही जंगलाजवळ नाही. अशा नव्या परिसरात वाघ दिसायला लागल्याने वनसीमा ओलांडून वाघ आता शेतशिवारातून प्रवासाला निघत असल्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे.
वाघांना शेतशिवारातून चालण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. हजारो हेक्टर वनजमिनी अतिक्रमणात वाटप होऊनही माणसांची जंगलावरील अतिक्रमाणाची भूक संपलेली नाही. त्याचा परिणाम अशा घटनांमधून दिसत आहे.
अशोक खुणे, सेवानिवृत्त डीएफओ, नवेगाव बांध