श्रीराम शोभायात्रेच्या दरम्यान कडेकोट पोलिस बंदोबस्त, पोद्दारेश्वर मार्गावर ५ तास 'नो एन्ट्री'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 02:05 PM2023-03-29T14:05:18+5:302023-03-29T14:08:50+5:30
वाहतूककोंडी टाळण्याचे आव्हान
नागपूर : कोरोनानंतर प्रथमच श्रीरामजन्मोत्सवानिमित्त उपराजधानीत शोभायात्रेचे भव्य आयोजन होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पोद्दारेश्वर राम मंदिर, तसेच पश्चिम नागपुरातील राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेला पाहण्यासाठी नागरिकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता, पोलिस विभागातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शोभायात्रेच्या दरम्यान वाहतूककोंडीची शक्यता लक्षात घेता, वाहतूक विभागातर्फे शोभायात्रेच्या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गांनी वळविण्यात येणार आहे.
२०१९ साली शोभायात्रेचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर, कोरोनाचे संकट आल्याने शोभायात्रा निघाली नव्हती. या वर्षी शोभायात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे भक्तगणांसोबतच नागरिकांमध्येही उत्साह आहे. या पार्श्वभूमीवर शोभायात्रेच्या मार्गावर पोलिसांचा विशेष बंदोबस्त राहणार आहे. साध्या वेशातील पोलिसही तैनात करण्यात येणार असून, आवश्यक प्रमाणात महिला पोलिसांचा बंदोबस्तही राहणार आहे. संबंधित पोलिस ठाण्यांकडून बंदोबस्ताचा आढावा घेण्यात आला.
दरम्यान, दोन्ही शोभायात्रांदरम्यान वाहतूक पोलिसांचाही जागोजागी बंदोबस्त राहणार आहे. श्रीरामनवमीच्या दिवशी पोद्दारेश्वर राम मंदिराच्या मार्गावर सकाळी ९ ते दुपारी साडेबारा, तसेच दुपारी तीन ते साडेचार या दरम्यान पादचारी वगळता सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.
शोभायात्रेच्या दरम्यान या मार्गावर वाहतुकीला बंदी
राम जन्मोत्सव शोभायात्रा ही पोद्दारेश्वर राममंदीर, मेयो हाॅस्पिटल चौक, भगवारघर चौक, गांजाखेत चौक, तिननल चौक, शहीद चौक, टांगा स्टॅन्ड, गांधी पुतळा, बडकस चौक, महाल गांधी गेट, टिळक पुतळा, गणेश मंदिर टर्निंग, आग्याराम देवी चौक, गीतामंदिर, काॅटन मार्केट चौक, लोखंडी पूल, आनंद टाॅकीज, मुंजे चौक, झाशी राणी चौक, व्हरायटी चौक, बर्डी मेन रोड, मानस चौक, जयस्तंभ चौक, रेल्वे ओव्हर ब्रिज अशा मार्गाने जाईल. या मार्गावरून शोभायात्रा जात असताना, संलग्न मार्गावरून येणाऱ्या वाहतुकीस बंदी घालण्यात येईल.
जड वाहतुकीलाही बंदी
कडबी चौकाकडून आणि काॅटन मार्केट चौकाकडून ओव्हरब्रिजकडे तसेच टेलिफोन एक्सचेंज चौकाकडून सेन्ट्रल एव्हेन्यूमार्गे ओव्हर ब्रिजकडे येणाऱ्या मार्गावर, तसेच सरदार पटेल चौकाकडून काॅटन मार्केट चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारचा जड वाहतुकीस दुपारी दोन वाजल्यापासून ते शोभायात्रा संपेपर्यंत बंदी घालण्यात आली असल्याची माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त चेतना तिडके यांनी दिली.