Winter Session Nagpur | विधानभवनात कडेकोट बंदोबस्त, तरी परिसरात मोकाट कुत्र्यांचा ‘मोर्चा’
By योगेश पांडे | Published: December 21, 2022 08:55 PM2022-12-21T20:55:21+5:302022-12-21T20:56:03+5:30
चालत्या-फिरत्या धोक्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: विधीमंडळाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा फोर्सवन ते क्युआरटीची पथके तैनात करण्यात आली आहेत. ‘परिंदा भी पर नही मार सकता’ अशी सुरक्षाव्यवस्था असताना त्याला भेदून मोकाट कुत्र्यांनी मात्र विधानभवन परिसरात सहज प्रवेश केला आहे. सायंकाळच्या वेळी तर अक्षरश: शाळा भरल्यासारखे ते एका ठिकाणी जमले होते. त्यांना हाकलून लावण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नसून लोकप्रतिधिनींना दंश झाल्यावरच जाग येणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
शहरात मोकाट कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे.
अनेक भागात हे कुत्रे घोळक्यात राहतात व ध्यानीमनी नसताना अचानक हल्ला करतात. शहरात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी तर फारच गोंधळ करतात. रात्री घरी जाणाऱ्यांना अक्षरश: मुठीत जीव घेऊन रस्त्याने जावे लागते. नागपुरातील कुठल्याही कोपऱ्यातील नागरिकाला विचारले की सगळ्यात जास्त कशाची भिती वाटते तर बहुतांश लोकांचे उत्तर मोकाट कुत्रे हेच येईल. न्यायालयानेदेखील मोकाट कुत्र्यांच्या मुद्द्यावर प्रशासनाला अनेकदा फटकारले आहे. मात्र त्यावर थातुरमातूर पावले उचलून परत ‘जैसे थे’ स्थितीच होते. विधानभवन परिसरात अधिकाऱ्यांच्या याच हलगर्जीपणाचे उदाहरण पहायला मिळत आहे. बचतगटांतर्फे चालविले जाणारे उपहारगृह, ग्रंथालय तसेच विधानभवनाच्या मागच्या बाजूस मोकाट कुत्रे सहज फिरताना दिसून येतात.
VIP असताना देखील दुर्लक्ष- विधानभवन परिसरात अनेक ‘व्हीआयपी’ मान्यवरांचा संचार असतो. अशा स्थितीत मोकाट कुत्र्यांमुळे त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
पक्ष कार्यालयाजवळदेखील ठिय्या- काही मोकाट कुत्र्यांनी चक्क काही पक्षांच्या कार्यालयाजवळच ठिय्या मांडला आहे. कार्यकर्ते व कर्मचारी उरलेसुरले अन्न कुत्र्यांना आणून टाकतात. त्यामुळे कुत्रे भटकत असल्याचे चित्र आहे.