गाळात फसून वाघिणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 08:11 PM2019-03-06T20:11:15+5:302019-03-06T20:24:11+5:30
पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात (मानसिंगदेव अभयारण्य) ब्रांदा तलाव नजीकच्या गाळात फसून एका वाघिणीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी वनविभागाच्या गस्ती पथकामुळे ही बाब उजेडात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (देवलापार) : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात (मानसिंगदेव अभयारण्य) ब्रांदा तलाव नजीकच्या गाळात फसून एका वाघिणीचामृत्यू झाला आहे. बुधवारी वनविभागाच्या गस्ती पथकामुळे ही बाब उजेडात आली. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात कक्ष क्र. ४९८ मध्ये बांद्रा तलाव क्र. १ येथे नियमित गस्त करत असताना वनपाल जीवन पवार आणि इतर वनरक्षक यांना एक प्रौढ वाघ गाळात फसलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर,उपसंचालक अमलेंदू पाठक, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, मुख्य वन्यजीव रक्षक यांचे प्रतिनिधी अनिल दशहरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुबोध नंदागवळी, डॉ. चेतन पातोंड, डॉ. विनोद समर्थ, सहायक वन संरक्षक (अतिरिक्त कार्यभार) अतुल देवकर घटनास्थळी दाखल झाले.
अधिकाऱ्यांनी मृत वाघिणीपासून ५०० मीटर परिघामध्ये तपास केला असता कोणत्याही प्रकारची अवैध बाब त्यांना आढळून आली नाही. वाघिणीचे चारी पाय खोल गाळात फसलेले आढळून आले तसेच तोंडाचा भाग तसेच शरीराचा भाग देखील गाळात फसल्याचा दिसून आले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या कार्यपद्धतीनुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाघिणीचे शवविच्छेदन केले. प्राथमिक परिस्थितीजन्य पुराव्यानुसार वाघिणीचा मृत्यू हा दलदलीत अडकल्याने आणि श्वासनावरोधाने झाला असल्याचे दिसून येते. सादर वाघिण ही घटनास्थळाकडे येत असतानाच्या स्पष्ट खुणा दिसून आल्या आहे. उपस्थित अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता वाघिणीचे नखे, सुळे आणि इतर सर्व अवयव मूळ जागेवर आढळून आले. शवविच्छेदनानंतर अधिकाऱ्यांच्या समक्ष वाघिणीचे दहन करण्यात आले. भारतीय वन्यजीव संस्थानच्या संशोधक आकांक्षा यांनी सदर वाघिणीची ओळख पटविली. त्यांच्या सांगण्यानुसार सदर वाघिण अलीकडेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर लावलेल्या कॅमेरा ट्रॅप मध्ये दिसून आली होती.
मृत्यू किती दिवसांपूर्वी ?
ब्रांदा तलाव नजीकच्या गाळात फसून वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना बहुतेक सात ते आठ दिवसापूर्वीची असावी असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र या परिसरात जर वनविभागाची नियमित गस्त असेल तर त्यांना ही बाब उशिरा का लक्षात आली, हा प्रश्नच आहे. यासोबत गाळात फसलेल्या वाघिणीने स्वत:ला वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाही का, हाही एक प्रश्न आहे.