दुडुदुडु धावणाऱ्या रुबाबदार, राजस पाहुण्यांनी कऱ्हांडला बहरला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 10:32 AM2022-03-04T10:32:54+5:302022-03-04T10:43:30+5:30

उमरेड-कऱ्हांडलाचे जंगल आता या नव्या तीन राजस अन् रुबाबदार पाहुण्यांच्या आगमनाने मोहरले आहे.

tigress t1 was seen roaming with three cubs in Umred-Karhandla forest | दुडुदुडु धावणाऱ्या रुबाबदार, राजस पाहुण्यांनी कऱ्हांडला बहरला !

दुडुदुडु धावणाऱ्या रुबाबदार, राजस पाहुण्यांनी कऱ्हांडला बहरला !

Next
ठळक मुद्दे‘कॉलरवाली’चे अंगण तीन बछड्यांनी मोहरले पर्यटकांना आईसोबत झाले पहिल्यांदाच दर्शन

नागपूर : ‘ते’ आले की सर्वांचेच कान टवकारतात..! श्वास रोखले जातात..! मात्र ‘त्यांना’ त्याची कसलीच दखल नसते. आपल्या आईपाठोपाठ रानात पाचोळा तुडवत ‘ते’ स्वच्छंदपणे बागडतात. दंगामस्ती करत खेळतात. त्यांचे कुतूहल सर्वांनाच आहे. ‘ते’ दुसरे तिसरे कुणी नसून कॉलरवाली वाघिणीचे तीन बछडे आहेत.

उमरेड-कऱ्हांडलाचे जंगल आता या नव्या तीन राजस अन् रुबाबदार पाहुण्यांच्या आगमनाने मोहरले आहे. मागील ऑगस्ट-२०२१ पासून पर्यटकांना क्वचित दिसणारी टी-१ ही कॉलरवाली वाघीण मधल्या काळात जवळपास सहा महिने गायबच झाली होती. ती गर्भवती असल्याचा अंदाज वनविभागाला आला होता. या वाघिणीचा साथीदार ‘सूर्या’ हा मात्र अभयारण्यातील गोठनगाव तर कधी कुही वन परिक्षेत्रात दिसायचा. याच दरम्यान अचानकपणे फेब्रुवारीच्या अखेरीस एका पर्यटकाला ही वाघीण आपल्या तीन बछड्यांसह कऱ्हांडलाच्या सतीघाट पाणवठ्यावर पाणी पिताना दिसली.

सूत्रांच्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी कऱ्हांडलातील या वाघिणीला सी-२ या वाघापासून तीन बछडे झाले होते. मात्र सूर्या या शक्तिशाली वाघाचे ताडोबाकडून या जंगलात आगमन झाले, तेव्हापासून सी-२ येथून बेपत्ताच झाला. त्यानंतर सूर्या नेहमी कॉलरवालीसोबतच फिरताना दिसायचा. दरम्यान, मार्च २०२१ मध्ये सूर्याने कॉलरवालीच्या तीन बछड्यांना मारून टाकले होते. त्यापैकी दोघांचे शव मिळाले होते. तिसऱ्याचा पत्ता आजवर लागू शकला नाही. यानंतर सूर्या आणि कॉलरवाली नेहमी एकत्र फिरताना दिसायचे. ऑगस्टपासून काॅलरवाली दिसत नव्हती. आता कऱ्हांडलाचे वन परिक्षेत्र अधिकारी आर. बी. निबेंकर यांनीही ही वाघीण तीन बछड्यांसह दिसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

गोठणगाव क्षेत्रात वाघाचे पाच बछडे

प्राप्त माहितीनुसार, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या गोठणगाव क्षेत्रात वाघीण टी-६ हिलासुद्धा ५ बछडे आहेत. तेसुद्धा सूर्यापासूनच झाले असल्याचे सांगितले जात आहे.

वर्षापूर्वी होते ‘जय’चे आकर्षण

उमरेड-कऱ्हांडलामध्ये पर्यटकांना काही वर्षांपूर्वी जय नावाच्या वाघाचे आकर्षण होते. त्याला पहाण्यासाठी पर्यटक उत्सुक असत. मात्र तो जुलै-२०१६ पासून अचानकपणे बेपत्ता झाला. त्यामुळे पर्यटक निराश झाले. आता या जंगलात तीन बछडे फिरायला लागल्याने हे अभयारण्य पुन्हा बहरले आहे.

Web Title: tigress t1 was seen roaming with three cubs in Umred-Karhandla forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.