पेंच व्याघ्र प्रकल्पात संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळली वाघीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 09:54 PM2021-12-28T21:54:11+5:302021-12-28T21:54:41+5:30
Nagpur News पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत सालेघाट वनपरिक्षेत्रातील पाथर बीटच्या कक्ष क्रमांक ६२५ मध्ये एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली आहे.
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत सालेघाट वनपरिक्षेत्रातील पाथर बीटच्या कक्ष क्रमांक ६२५ मध्ये एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली. विशेष म्हणजे २७ डिसेंबरला पर्यटकांकडून मिळालेल्या वाघिणीच्या अतिशय अशक्त अवस्थेतील व्हिडीओमुळे वनविभागात खळबळ उडाली हाेती. त्यानंतर वनविभागाचे पथक निगराणीवर हाेते पण मंगळवारी ती मृतावस्थेत आढळून आली.
पेंचच्या सालेघाट वनपरिक्षेत्रात या टी-३५ वाघिणीचे वास्तव्य हाेते. ती जवळपास ८ ते ९ वर्षांची हाेती. याचा अर्थ वयाने तरुणच हाेती. मात्र पर्यटकांकडून २७ डिसेंबरला या वाघिणीचा अनियमित हालचालीचा व्हिडीओ व्हायरल झाला. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरामध्येही तिच्या या अनैसर्गिक हालचाली नाेंदविण्यात आल्याची माहिती आहे. ती कसल्यातरी त्रासामुळे ओरडत हाेती व तिला उठताही येत नव्हते. हा व्हिडीओ येताच मंगळवारी पेंच वनविभागाचे पथक डाॅक्टरांसह संबंधित स्थानाकडे रवाना झाले. मात्र दुपारी १ वाजताच्यादरम्यान ही वाघीण मृतावस्थेत आढळून आली.
डाॅक्टरांच्या टीमने प्राथमिक पाहणी केली असता तिच्या अंगावर कुठल्याही जखमा आढळून आल्या नाहीत. पेंचचे उपसंचालक प्रभुनाथ शुक्ला यांनी पाेस्टमार्टम रिपाेर्ट आल्यानंतरच मृत्युचे कारण कळेल, असे स्पष्ट केले. दरम्यान पाऊस सुरू झाल्याने वाघिणीला आणण्यासाठी गेलेल्या पथकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे तिचे शव आणायला रात्र झाली. आता बुधवारीच शवविच्छेदन करणे शक्य हाेईल आणि त्यानंतर मृत्युचे कारण कळू शकेल, अशी माहिती एसीएफ अतुल देवकर यांनी दिली.
मृत्यू सर्पदंशाने की अर्धांगवायूने?
दरम्यान वाघिणीच्या अनैसर्गिक हालचालींचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने नेमके काय झाले असावे, याचा अंदाज लावला जात आहे. शिकार करताना पाठीला अंतर्गत जखम झाली असल्यास तिला हालचाल करण्यास व उठण्यास त्रास हाेत असेल. मात्र बाह्य जखम नसल्याने ते कारण नसावे, असेही मत आहे. याशिवाय विषारी साप चावल्याने किंवा अर्धांगवायूने तिला उठणे शक्य झाले नसेल व त्यातच तिचा मृत्यू झाल्याचाही अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. याशिवाय कुत्र्यांच्या रेबिजसारखा कॅनेन डिस्टेंपर हा आजार झाल्याने तिचा मृत्यू झाला का, असाही अंदाज आहे. खरे कारण पाेस्टमार्टम रिपाेर्ट आल्यावरच कळू शकेल.