महाराज बागेतील वाघिणीला मिळणार जोडीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 12:33 AM2020-08-05T00:33:01+5:302020-08-05T00:34:55+5:30
मागील काही वर्षांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या ‘जान’ वाघिणीला आता जोडीदार मिळणार आहे. प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालयाने यासाठी परवानगी दिली असून सध्या गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात असलेला एनटी-१ हा नर वाघ आता महाराज बागेत आणला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही वर्षांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या ‘जान’ वाघिणीला आता जोडीदार मिळणार आहे. प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालयाने यासाठी परवानगी दिली असून सध्या गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात असलेला एनटी-१ हा नर वाघ आता महाराज बागेत आणला जाणार आहे.
या वाघिणीला जोडीदार मिळावा यासाठी महाराज बाग प्राणिसंग्रहालयाकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. वरिष्ठांकडे पाठपुरावाही सुरू होता. अशातच, चार जणांचे बळी घेणाऱ्या या नर वाघाला ब्रह्मपुरी येथून १९ जुलैला जेरबंद करून आणले होते. देखभाल आणि उपचारासाठी त्याला गोरेवाडामध्ये ठेवण्यात आले होते. गोरेवाडामध्ये प्राण्यांचे पिंजरे पूर्ण भरल्याने आणि आणि महाराज बाग व्यवस्थापनाकडून होत असलेली मागणी लक्षात घेता या वाघाला पुढील आदेशापर्यंत महाराज बागेत पाठविण्याच्या निर्णयावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले आहे. गोरेवाडा प्राणी बचाव केद्राचे विभागीय व्यवस्थापक आणि महाराज बाग प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांना मुख्य वन्यजीवरक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी पत्रद्वारे हे आदेश दिले आहेत.
झालेल्या निर्णयानुसार, या वाघाला बुधवारी सकाळी महाराज बागेत आणले जात असून पुढील आदेशापर्यंत त्याला येथे ठेवले जाणार आहे. सध्या येथे असलेल्या ‘जान’ या वाघिणीच्या दोन बहिणींपैकी एक ‘ली’ हिला ब्रिडींगसाठी गोरेवाडा येथे नेण्यात आले आहे तर दुसरी ‘चेरी’ हिला छत्तीसगडमधील काननपैंढरी येथील प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आले आहे. १२ वर्षांची असलेली जान मागील काही वर्षांपासून एकटीच होती.
नागरिकांना पाहाण्यासाठी नाही
पुढील काळात एनटी-१ ला निसर्गमुक्त करावे किंवा कायम पिंजऱ्यात ठेवावे याबद्दल समितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेतला जाणार आहे. नागरिकांना पाहण्याची सध्यातरी अनुमती नाही. या संदर्भात सीझेडचे आदेश आल्यावर निर्णय घेतला जाइल, असेही काकोडकर यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे ‘जान’च्या वाट्याला आलेले एकाकी जीवन आता संपणार आहे. मागील अनेक वर्षांची मागणी पूर्ण होण्यात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांचे मोठे योगदान आहे. नागपूरकरांचीही या मागणीला साथ होती. त्याला आता यश आले आहे.
सुनील बावीसकर, प्रभारी व्यवस्थापक, महाराज बाग प्राणिसंग्रहालय