टाईल्स न काढता लावले ग्रेनाईट
By admin | Published: February 13, 2017 02:44 AM2017-02-13T02:44:01+5:302017-02-13T02:44:01+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावर सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. यात काही वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या कोटा टाईल्सवर आता ग्रेनाईट मार्बल लावण्यात येत आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : कंत्राटदाराची घाई, प्रवाशांची गैरसोय
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. यात काही वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या कोटा टाईल्सवर आता ग्रेनाईट मार्बल लावण्यात येत आहे.
या ग्रेनाईट मार्बलची काहीच आवश्यकता नसल्याचे खुद्द रेल्वे कर्मचाऱ्यांचे मत आहे. ग्रेनाईट मार्बल लावून रेल्वेस्थानकाची फरशी चकचकीत करून सौंदर्य वाढेल. परंतु काही दिवसांपासून हे काम करणाऱ्या कंत्राटदाराने घाईगडबडीत काम केल्यामुळे प्रवाशांचा मनस्ताप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.(प्रतिनिधी)
‘सिनिअर डीईएन’ने फटकारले
ग्रेनाईट लावण्यासाठी काढलेल्या निविदेनुसार आधी कोटा टाईल्स काढणे गरजेचे आहे. परंतु कंत्राटदाराने कोटा टाईल्स न काढताच स्कॅनिंग मशीन, जनाहार, उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयासमोर ग्रेनाईट बसविले. रेल्वेस्थानकावर सुरू असलेल्या या कामाची पाहणी करण्यासाठी वरिष्ठ विभागीय अभियंता आले असता त्यांना कोटा टाईल्स न काढताच ग्रेनाईट बसविल्याचे लक्षात आले. त्यांनी संबंधित कंत्राटदाराला चांगलेच फटकारले. त्वरित त्यांनी ग्रेनाईट काढून कोटा टाईल्स हटविण्याचे आदेश दिले. रविवारी ग्रेनाईट काढून पुन्हा कोटा टाईल्स काढण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे पाच फुटांपेक्षा अधिक काम होऊ शकले नाही. अशा स्थितीत उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात येणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप झाला.
कोटा टाईल्स न काढताच केले काम
ग्रेनाईट बसविण्याच्या कामात संबंधित विभागाचा दुर्लक्षितपणा पुढे आला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, मुख्य प्रवेशद्वारावर पूर्ण ग्रेनाईट लावण्यात आले आहे. तर स्लिपर वेटिंग हॉललाही ग्रेनाईटही लावण्यात आले आहे. परंतु दोन्ही ठिकाणी आधी लावण्यात आलेल्या कोटा टाईल्स हटविण्यात आल्या नाही. वेटिंग हॉलमध्ये कामही पूर्ण झाले आहे.