डाळीचा तडका ६०
By Admin | Published: June 29, 2017 02:25 AM2017-06-29T02:25:00+5:302017-06-29T02:25:00+5:30
गेल्यावर्षी १५० रुपये किलो आणि यावर्षीच्या हंगामात मार्चमध्ये ७५ रुपयांवर असलेल्या सर्वोत्तम तूर डाळीचे दर चांगल्या मान्सूनच्या वृत्ताने
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्यावर्षी १५० रुपये किलो आणि यावर्षीच्या हंगामात मार्चमध्ये ७५ रुपयांवर असलेल्या सर्वोत्तम तूर डाळीचे दर चांगल्या मान्सूनच्या वृत्ताने बुधवारी होलसेल बाजारात ५६ रुपयांपर्यंत उतरले आहेत. किरकोळ बाजारात ६० ते ६२ रुपये दर आहेत.
दोन महिन्यांत दर वेगाने कमी
गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूर डाळीचे दर गेल्या दोन वर्षांपासून आकाशाला भिडले होते. त्यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. डाळीचे भाव सामान्यांच्या आवाक्यात यावेत, यासाठी सरकारनेसुद्धा प्रयत्न केले होते. यंदा तुरीचे उत्पादन विक्रमी झाल्यामुळे गेल्या दोन महिन्यांमध्येच तूरडाळीचे दर वेगाने कमी झाले आहेत.
मार्चमध्ये प्रारंभी कळमना बाजारात दर ७५ रुपये किलो आणि त्यानंतर सरकारने आयात शुल्क वाढविल्यानंतर दर ८० रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यावेळी उठाव कमी असल्यामुळे दर पुन्हा ७५ रुपयांपर्यंत खाली आले. यावर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे तुरीची तीन ते चार हजार रुपये क्विंटल दराने विक्री झाली. त्यामुळे डाळीचे भाव आणखी उतरले. दर कमी झाल्यानंतरही खरेदीदार नाहीत, अशी माहिती धान्य बाजाराचे समीक्षक रमेश उमाटे यांनी दिली. सध्या तूरडाळ होलसेल बाजारात दर्जानुसार ५० ते ५५ रुपये आणि किरकोळ बाजारात ६० ते ६२ रुपये किलो दराने विकली जात आहे.
चांगल्या मान्सूनचा परिणाम : दरवाढीवर नियंत्रण
चणा डाळ ९५ रुपये किलो
तूरडाळीप्रमाणेच मागील महिन्याच्या तुलनेत चणाडाळ, मूगडाळ, मसूरडाळ आणि उडद मोगरच्या दरामध्ये वेगाने घसरण झाली आहे. गेल्यावर्षी १२० ते १३० रुपये किलोवर पोहोचलेली चणा डाळ यावर्षी होलसेल बाजारात ८० ते ८५ रुपये दर आहेत. किरकोळ बाजारात ९० ते ९५ रुपये दर आहेत. याशिवाय अन्य डाळींचेही दर स्थिर आहेत. मसूर डाळ ५२ ते ५६ रुपये किलो, मूग डाळ ५० ते ६५ आणि गेल्यावर्षी १६० रुपये किलोपर्यंत पोहोचलेल्या उडद मोगरचे दर आता ८२ ते ९२ रुपयांवर स्थिर आहेत. गेल्यावर्षी उडद मोगरच्या दरामुळे लग्नाच्या मेजवानीतून दहीवड्याने ‘एक्झिट’ घेतली होती.
उमाटे यांनी सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत किरकोळ व्यापारी तूरडाळ आणि चणाडाळीचा साठा करीत नाहीत. ते हवा तेवढाचा माल विक्रीसाठी बोलवितात. त्यामुळे गुंतवणूक कमी होते आणि अन्य मालाची खरेदी करणे शक्य होते, असा व्यापाऱ्यांचा उद्देश आहे. एवढेच नव्हे तर वार्षिक धान्याचा साठा करण्याची ग्राहकांची पद्धतसुद्धा बदलली आहे. सर्व धान्य ३० किलोच्या पॅकिंगमध्ये येत असल्यामुळे तेसुद्धा आवश्यक तेवढेच धान्य खरेदी करतात. त्याचाही फटका बाजारपेठेला बसला आहे.