१२०० किडरोग सर्वेक्षकांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 11:42 PM2018-07-17T23:42:31+5:302018-07-17T23:43:10+5:30
किडरोग सर्वेक्षकांचे काम कृषी विभागातील कृषी सहायक यांच्यावर देण्यात आल्याने राज्यातील १२०० किडरोग सर्वेक्षक बेरोजगार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाचा हा निर्णय तात्काळ रद्द करून क्रॉपसॅप-हॉर्टसॅप प्रकल्पातील किडरोग सर्वेक्षकांना तात्काळ कामावर घेण्याच्या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य तांत्रिक कृषी किडरोग सर्वेक्षक संघटनेने विधिमंडळावर मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : किडरोग सर्वेक्षकांचे काम कृषी विभागातील कृषी सहायक यांच्यावर देण्यात आल्याने राज्यातील १२०० किडरोग सर्वेक्षक बेरोजगार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाचा हा निर्णय तात्काळ रद्द करून क्रॉपसॅप-हॉर्टसॅप प्रकल्पातील किडरोग सर्वेक्षकांना तात्काळ कामावर घेण्याच्या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य तांत्रिक कृषी किडरोग सर्वेक्षक संघटनेने विधिमंडळावर मोर्चा काढला.
या मोर्चाचे नेतृत्व यशवंत शेंडगे, अमोल बिराजदार, उमेश रसाळ, सागर पाटील, रवींद्र लोकरे, विकास देशमुख, सचिन गायकवाड आदीननी केले.
राज्यातील ३६ जिल्ह्यातील किडरोग सर्वेक्षक सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, भात, चिकू, डाळिंब, केळी, संत्री, आंबा व इतर फळांवरील किडरोग सर्वेक्षण व संनियंत्रण सल्ला प्रकल्प म्हणजे ‘क्रॉपसॅप-हॉर्टसॅप’ अंतर्गत २००९ पासून शेतकऱ्यांच्या सेवार्थ कार्य करीत होते. या योजनेला ‘ई-गव्हर्नस’ पुरस्कार प्राप्त आहे. मात्र, शासनाने १९ मे २०१८ रोजी शासन निर्णय घेत सर्वेक्षकांना कामावरून कमी करून त्यांची कामे कृषी सहायक यांच्याकडे दिली. परिणामी, १२०० किडरोग सर्वेक्षक बेरोजगार झाले. सर्वेक्षकांनी सलग नऊ वर्षे सेवा दिल्यानंतर आता हाती दुसरे कुठले काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. किडरोग सर्वेक्षकांना कामावर परत घेण्याची मागणी असल्याचे मोर्चाच्या शिष्टमंडळाने सांगितले.