वैद्यकीय उपचाराच्या वेळी साईबाबासोबत राहू द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 08:18 PM2018-04-03T20:18:03+5:302018-04-03T20:18:28+5:30
बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर मार्इंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (४८) ९० टक्के दिव्यांग असून त्याच्यावर आवश्यक तेव्हा वैद्यकीय उपचार केले जातात. त्यावेळी साईबाबासोबत राहण्याची परवानगी मिळावी यासाठी पत्नी वसंता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर मार्इंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (४८) ९० टक्के दिव्यांग असून त्याच्यावर आवश्यक तेव्हा वैद्यकीय उपचार केले जातात. त्यावेळी साईबाबासोबत राहण्याची परवानगी मिळावी यासाठी पत्नी वसंता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला यावर एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबा व त्याच्या साथीदारांना दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी धरून कमाल जन्मठेप व अन्य विविध प्रकारची शिक्षा सुनावली आहे. त्याविरुद्ध साईबाबासह इतर आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले असून ते अपील अंतिम सुनावणीसाठी दाखल झाले आहे. साईबाबाने अपीलवर अंतिम निर्णय होतपर्यंत शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्याच प्रकरणात वसंता यांनीही अर्ज दाखल केला आहे. दोन्ही अर्जांवर एकत्र सुनावणी केली जात आहे. अर्जदारांतर्फे अॅड. सुरेंद्र गडलिंग तर, सरकारतर्फे अॅड. प्रशांतकुमार सत्यनाथन यांनी कामकाज पाहिले.