यंदा कांदा रडविणार, भाव दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:10 AM2019-09-09T11:10:19+5:302019-09-09T11:13:58+5:30
उन्हाळ्यात सुरुवातीला कांद्याचे भाव ८ ते १० रुपये असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याचा स्टॉक केला. तो कांदा आता शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : किरकोळ बाजारात कांदा प्रतवारीनुसार ४० रुपये किलोपर्यंत विकण्यात येत असल्याने नेहमी शेतकऱ्यांना रडविणाºया कांद्याने आता रडविण्याचा गुणधर्म पुन्हा एकदा सामान्य नागरिकांना दाखविला आहे. कळमना ठोक बाजारात भाव २५ ते २८ रुपये आहेत. त्यापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. त्याचा फायदा शेतकरी आणि ग्राहकांना न होता व्यापाऱ्यांना अधिक होत असल्याची परिस्थिती आहे. भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. कळमना बाजारात गेल्या महिन्याच्या १४ ते १५ रुपये किलोच्या तुलनेत सध्या लाल कांद्याचे भाव २५ ते २८ रुपये आणि पांढऱ्या कांद्याचे ३० ते ३२ रुपयांवर पोहोचले आहेत. या तुलनेत किरकोळमध्ये भाव जास्त आहेत. किरकोळ बाजारात ४० रुपये भावामुळे ग्राहक त्रस्त आहेत. भाव आणखी वाढल्यास सुरुवात झाल्यास केंद्र शासन खरेदी करून स्टॉक केलेला कांदा बाजारात आणतील. त्यामुळे भावावर नियंत्रण येईल. याशिवाय नवीन कांदा लवकरच बाजारात येईल, असे वसानी म्हणाले.
बटाट्याचे भाव स्थिर
बटाट्याचे पीक देशभरात घेतले जाते. भरपूर स्टॉक असल्यामुळे कळमन्यात वर्षभरापासून प्रति किलो भाव ८ ते १० रुपयांदरम्यान आहेत. कळमन्यात दररोज आग्रा, कानपूर, इटावा येथून २० ट्रकची आवक आहे. किरकोळमध्ये भाव दुपटीवर आहेत.
दोन महिन्यात लसणचे भाव दुप्पट
दोन महिन्यांपूर्वी कळमन्यात ५० ते ६० रुपयांवर असणारे लसणचे भाव दर्जानुसार १०० ते १२५ रुपयांवर पोहोचले आहेत. महिन्यापूर्वी भाव ८० ते १०० रुपये होते. किरकोळ बाजारात १४० ते १५० रुपयांदरम्यान विक्री होत आहे. नवीन पीक फेब्रुवारी आणि मार्चमध्ये येणार असल्यामुळे ग्राहकांना लसूण जास्त भावातच खरेदी करावे लागेल, असे वसानी म्हणाले. दररोज दोन ट्रकची आवक कोटा (राजस्थान), उज्जैन, रतलाम, (मध्य प्रदेश) येथून आहे.
यंदा ५० टक्के पीक कमी
कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी म्हणाले, गेल्यावर्षी कांद्याला भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कमी लागवड केली. शिवाय पावसामुळे बराच कांदा जमिनीतच खराब झाला आहे. त्यामुळे यंदा कांद्याचे पीक नेहमीच्या तुलनेत ५० टक्के कमी येण्याची शक्यता आहे. शिवाय आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यातून कांद्याची आवक एक महिना उशिरा सुरू झाली आहे. सध्या दोन ते तीन ट्रक येत आहेत.
उन्हाळ्यात सुरुवातीला कांद्याचे भाव ८ ते १० रुपये असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याचा स्टॉक केला. तो कांदा आता शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणला आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. हा स्टॉक दिवाळीपर्यंत येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या तुलनेत सध्या जास्त भाव मिळत आहे. कळमन्यात आठवड्यात सरासरी १५ ट्रकची आवक आहे. लाल कांदा बुलढाणा, शेगांव, मलकापूर, नांदुरा, उज्जैन (मध्यप्रदेश) येथून १० ते १२ आणि अमरावती, परतवाडा, मोर्शी येथून पांढरे कांदे २ ते ३ ट्रक येत आहेत. नवीन कांदा धुळे येथून दसऱ्याला आणि नाशिक येथील कांदा दिवाळीनंतर येईल. तसेच कर्नाटक येथील हुगळी, बेळगांव येथील कांदा महिन्यानंतर कळमनात येणार आहे. सध्या थोडा माल विक्रीसाठी येत आहे.