जगाला गुडबाय करण्याची वेळ, मी फुटाळ्यावर लाईव्ह येतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:11 AM2021-08-29T04:11:05+5:302021-08-29T04:11:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जगाला गुडबाय करण्याची वेळ आल्याचे नमूद करून मी फुटाळ्यावर लाईव्ह येतोय, अशी पोस्ट एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगाला गुडबाय करण्याची वेळ आल्याचे नमूद करून मी फुटाळ्यावर लाईव्ह येतोय, अशी पोस्ट एका तरुणाने फेसबुकवर पोस्ट केली. त्यात मित्र तसेच आई-बाबांची क्षमा मागत आरोग्य दूत म्हणून काम करणाऱ्या योगेश वासुदेव नासरे (वय २२) या तरुणाने विष प्राशन केले. शनिवारी दुपारी १ च्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
एका आमदाराच्या ॲम्ब्युलन्सवर आरोग्य दूत (चालक) म्हणून काम करणारा योगेश नरखेड (जि. नागपूर) जवळच्या भिष्णूर येथील रहिवासी होय. त्याने शनिवारी दुपारी त्याच्या मित्रांना फेसबुकवर एक पोस्ट टॅग केली. ‘मित्रांनो माफ करा. आता जगाला गुडबाय करण्याची वेळ आली. चांगले काम करणाऱ्याला खूप त्रास सहन करावा लागतो आणि लोकं असे बोलतात की, आपण जणू पापच करतोय’, असे या पोस्टमध्ये त्याने नमूद केले. आपण फुटाळा तलावावर ‘लाईव्ह’ येणार असल्याचेही त्यात नमूद केले आणि सोडून जात असल्याबद्दल स्वत:च्या आई-वडिलांची माफी मागितली’, ही फेसबुक पोस्ट वाचून धोका लक्षात आल्यामुळे त्याच्या मित्रांनी ती लगेच व्हायरल केली. नागपूर पोलिसांनी फेसबुक पोस्ट वाचल्यानंतर अंबाझरीचे ठाणेदार डॉ. अशोक बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने फुटाळा तलावाकडे धाव घेतली. योगेश तलावात उडी घेईल, असा अंदाज होता. त्यामुळे या भागातील पोहणाऱ्या काही तरुणांनाही पोलिसांनी तेथे सज्ज ठेवले. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास एक तरुण फुटाळा तलावाकडे येत असल्याचे बघून पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेतली. ते पाहून योगेश बाजूच्या वस्तीकडे धावला. तेथे त्याने खिशातील विषाची बाटली काढून विष प्राशन केले. पोलिसांनी लगेच त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. तत्पूर्वी रस्त्यात पोलिसांनी त्याचे नाव, गाव, पत्ता जाणून घेतला. त्यानंतर त्याच्या नातेवाइकांना माहिती कळविण्यात आली. मेडिकलमध्ये पोलिसांनी आधीच सूचित केल्यामुळे डॉक्टरांचे पथक योगेशच्या उपचारासाठी सज्ज होते. त्यामुळे त्याच्यावर तातडीने उपचार सुरू झाले. त्याची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचे सांगितले जात होते.
---
तलावात उडी घेण्याचा होता विचार
ॲम्ब्युलन्सवर चालक म्हणून काम करणारा योगेश वेगवेगळ्या रुग्णांना घेऊन नागपुरात नेहमीच येत होता. त्यामुळे त्याला नागपूरची बऱ्यापैकी माहिती होती. आज तो मोटारसायकलने नागपुरात पोहोचला. विष पिऊन फुटाळा तलावात उडी घेण्याचा त्याचा विचार असावा, मात्र, पोलीस तेथे असल्याने तलावात उडी घेणे योगेशला शक्य झाले नाही.
---
योगेशवर ही वेळ का आली ?
कोरोनाच्या काळात योगेशने स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेकांचे जीव वाचविले. आरोग्य सेवक, आरोग्य दूत म्हणून त्याचा ठिकठिकाणी सामाजिक संघटनांनी सत्कारही केला. असे असताना योगेशवर जीव देण्याची वेळ का यावी, असा प्रश्न या घटनेने उपस्थित झाला आहे. योगेश बेशुद्ध असल्याने त्याच्याकडून माहिती घेता आली नाही, असे ठाणेदार डॉ. बागुल यांनी लोकमतला सांगितले.
----