विद्यार्थीदशा भविष्याचा पाया रचण्याची योग्य वेळ
By admin | Published: February 4, 2016 02:52 AM2016-02-04T02:52:33+5:302016-02-04T02:52:33+5:30
लोकमत आणि व्हीआयटी विद्यापीठातर्फे इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा ‘फ्युच मंत्रा’चे आयोजन करण्यात आले.
लोकमत आणि व्हीआयटी विद्यापीठातर्फे करियर मार्गदर्शन
नागपूर : लोकमत आणि व्हीआयटी विद्यापीठातर्फे इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा ‘फ्युच मंत्रा’चे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व्हीआयटीचे असोसिएट प्रोफेसर तपन कुमार दास, मोटिव्हेशनल स्पीकर्स जगदीश अग्रवाल, स्नेहा ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्सचे चेअरमन रजनीकांत बोंदरे, अमर सेवा मंडळाच्या कोषाध्यक्ष प्रा. स्मिता वंजारी, कमला नेहरू कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरविंद शेंडे आणि उपप्राचार्य डॉ. प्रदीप दहिकर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रा. तपन कुमार दास म्हणाले, भारतात व्हीआयटी विद्यापीठ आठव्या स्थानावर असल्याचे सर्वेक्षण आहे. हे विद्यापीठ तामिळनाडू येथील चेन्नईजवळील वेल्लूरला आहे. व्हीआयटीमध्ये अभियांत्रिकीचे सर्व प्रकार आणि सर्वच पदव्यांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यात बी. टेक., एम. टेक., एमसीए, एमबीए, पीएच. डी. आदी अनेक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या हितासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
व्हीआयटी विद्यापीठ अभियांत्रिकीचे शिक्षणासाठीच लोकप्रिय आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमात सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल्स, संगणक विज्ञान, बी. टेक., एम. टेक., पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. येथून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोकरीसाठी कॅम्पस मुलाखतीतूनच निवड केली जाते. मागील वर्षी सात हजार विद्यार्थी नोकरीसाठी निवडण्यात आले. या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी प्रथम प्रवेश परीक्षा द्यावी लागते. प्रवेशाचे अर्ज सर्व प्रमुख टपाल कार्यालय आणि संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. व्हीआयटीत प्रवेश अर्ज भरून देण्याची अंतिम तिथी २८ फेब्रुवारी आहे.
जगदीश अग्रवाल म्हणाले, विद्यार्थी जीवन आपल्या भविष्याचा पाया रचण्यासाठीची अत्यंत योग्य वेळ आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या काळात गांभीर्याने आपले अभ्यासक्रम निवडले पाहिजे. याप्रसंगी रजनीकांत बोंदरे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अनेक विषय आणि शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. प्रारंभी अतिथींचे स्वागत लोकमतच्या इव्हेन्टचे सहप्रबंधक आतिश वानखेडे आणि अनुश्री बक्षी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पूनम तिवारी यांनी केले. (प्रतिनिधी)