नागपुरातील आमदार निवासात असलेल्या कोरोना संशयितांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 11:20 AM2020-05-12T11:20:51+5:302020-05-12T11:21:09+5:30
आमदार निवासात क्वारंटाईन करण्यात आलेल्यांंवर दुसऱ्या दिवशीही उपासमारीची वेळ आली. सकाळी ११ वाजता मिळणारे जेवण दुपारी ३.३० वाजता मिळाले. या प्रकाराने संतप्त झालेले संशयित आपल्या कक्षातून बाहेर पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आमदार निवासात क्वारंटाईन करण्यात आलेल्यांंवर दुसऱ्या दिवशीही उपासमारीची वेळ आली. सकाळी ११ वाजता मिळणारे जेवण दुपारी ३.३० वाजता मिळाले. या प्रकाराने संतप्त झालेले संशयित आपल्या कक्षातून बाहेर पडले. संशयितांची वाढती गर्दी पाहता वरिष्ठ पोलिसांना यात लक्ष घालण्याची वेळ आली.
आमदार निवासात क्वारंटाईन करण्यात आलेल्यांना दोन वेळचा नाश्ता, दोन वेळचे भोजन व पाण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडे आहे. शनिवारपर्यंत येथे सुरळीत सुरू होते. आमदार निवासातीलच कंत्राटदार त्यांना जेवण पुरवित होता. परंतु या कंत्राटदाराचा दर परडवत नसल्याचे कारण देऊन जिल्हा प्रशासनाने रविवारपासून दुसरा कंत्राटदार नेमला. परंतु सकाळचा ८ वाजता मिळणारा नाश्ता १०.३० वाजता त्याने आणला. हा नाश्ता अस्वच्छ वाहनातून आणण्यात आला होता. त्याचा दर्जा चांगला नसल्याचे येथील लोकांचे म्हणणे होते. सकाळी ११ वाजता मिळणारे जेवण रविवारी ३.३० वाजता मिळाले. रात्री सायंकाळी ७ वाजताचे जेवण १०.३० वाजता मिळाले. यातही दुपारच्या जेवणात काहींच्या डब्यात अळी आढळल्याच्या व्हिडिओतून केलेल्या तक्रारी समोर आल्या. सोमवारी सर्वकाही सुरळीत होईल, असे सर्वांनाच वाटत होते. या क्वारंटाइन सेंटरची जबाबदारी असलेले उपविभागीय अधिकारी शेखर गाडगे यांनीही याला दुजोरा दिला. परंतु दुपारी १२ वाजूनही जेवण न आल्याने क्वारंटाईन असलेले संशयित आपल्या कक्षाच्या बाहेर येऊन खाली गर्दी करू लागले. वाढती गर्दी पाहता अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलिसांना बोलविले. त्यांनी लोकांना समजावून सांगत असतानाच जेवणही आले. यामुळे काही काळ तणावाचे असलेले वातावरण निवळले. परंतु आमदार निवासातील क्वारंटाईन लोकांचे नियोजन योग्य पद्धतीने होत नसल्याचे या प्रकारातून पुन्हा एकदा समोर आले आहे. विशेष म्हणजे, क्वारंटाईन सेंटरकडे वरिष्ठ अधिकारी फिरकत नसल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचे येथे क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीने लोकमतला फोन करून सांगितले. या संदर्भात उपविभागीय अधिकारी शेखर गाडगे यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपला फोन बंद करून ठेवला होता.