शिक्षकांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 01:02 AM2019-04-04T01:02:05+5:302019-04-04T13:11:53+5:30
नागपूर लोकसभेचे ११ एप्रिलला मतदान आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. आयोगाच्या प्रयत्नानंतरही निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या शिक्षकांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. पोस्टल बॅलेटसाठी या शिक्षकांना विधानसभा क्षेत्राची चक्कर मारावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर लोकसभेचे ११ एप्रिलला मतदान आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. आयोगाच्या प्रयत्नानंतरही निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या शिक्षकांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. पोस्टल बॅलेटसाठी या शिक्षकांना विधानसभा क्षेत्राची चक्कर मारावी लागत आहे.
लोकसभेच्या मतदानासाठी सरकारी कर्मचारी व शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण बुधवारपासून सुरू झाले आहे. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शिक्षकांच्या तक्रारी आहेत की, पोस्टल बॅलेटसाठी त्यांचे फॉर्म प्रशिक्षण स्थळावर स्वीकारले जात नाही.
काटोल विधानसभा क्षेत्रातील शिक्षकांचे नुकतेच निवडणूक प्रशिक्षण झाले. शिक्षकांना पोस्टल बॅलेट फॉर्म भरण्यास सांगितले होते. परंतु केवळ काटोल विधानसभा क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या शिक्षकांचे फॉर्म स्वीकारण्यात आले. हिंगणा, सावनेर आदी विधानसभा क्षेत्रातील शिक्षकांना त्यांच्या विधानसभा क्षेत्रात फॉर्म जमा करण्यास सांगण्यात आले. परंतु जेव्हा शिक्षक आपल्या विधानसभा क्षेत्रात फॉर्म जमा करण्यास गेले, तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी पोस्टल बॅलेट फॉर्म स्वीकारण्यात येईल. बुधवारी दुसरेही प्रशिक्षण पार पडले. शिक्षक फॉर्म जमा करण्यास गेले तेव्हा फॉर्म स्वीकारण्यास नकार देण्यात आला. त्यांना संबंधित विधानसभा क्षेत्रातच फॉर्म जमा करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
प्रशिक्षण स्थळावरच घ्यावे फॉर्म
फॉर्म न स्वीकारल्यामुळे नाराज झालेल्या शिक्षकांचे म्हणणे आहे की, प्रशासनाकडून दरवेळी शिक्षकांना त्रास देण्यात येतो. एक शिक्षक आपला अनुभव सांगताना म्हणाले की, मी २००० मध्ये नोकरीला लागलो. गेल्या १९ वर्षात ४ लोकसभा, विधानसभा, ग्रा.पं., पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत ड्युटी केली. पण आतापर्यंत केवळ एकदाच पोस्टल बॅलेटने मतदान करण्याची संधी मिळाली. शिक्षकांचे म्हणणे आहे की, प्रशिक्षण स्थळावरच सर्व शिक्षकांचे फॉर्म स्वीकारण्यात यावे. ते संबंधित विधानसभा क्षेत्रात पाठवून पोस्टल बॅलेट उपलब्ध करून द्यावे. एकीकडे निवडणूक आयोग प्रत्येक मत किमती असल्याचे सांगून जनजागृती करीत आहे. दुसरीकडे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून शिक्षकांचे मतदान नाकारण्यात येत आहे.