यंदा आलीच नाही चायना राखी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:11 AM2021-08-13T04:11:44+5:302021-08-13T04:11:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बहीण-भावाच्या प्रेमबंधनाचा सण ‘रक्षाबंधन’ यंदा २२ ऑगस्टला येत आहे. शहरातील बाजारपेठेत राख्यांची दुकाने सजली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहीण-भावाच्या प्रेमबंधनाचा सण ‘रक्षाबंधन’ यंदा २२ ऑगस्टला येत आहे. शहरातील बाजारपेठेत राख्यांची दुकाने सजली आहेत. कोरोना संक्रमणानंतर यंदा चायना राख्या मात्र गायब झाल्या आहेत. परंतु स्थानिक राख्यांचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोना प्रतिबंधामुळे कारागिरांनी उशिरा काम सुरू केल्याने राखी तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये आता अखेरच्या टप्प्यात लगबग सुरू आहे.
इतवारी, महाल येथे असलेल्या ठोक बाजारातही दरवाढ झालेली यंदा दिसत आहे. यामुळे किरकोळ विक्रेत्यांनीही दर वाढविले आहेत. फॅक्टरीमध्ये कारागीर कमी असल्याने विलंबाने ऑर्डर दिली गेली. त्यामुळे मालही उशिराने आल्याचे त्यांचे मत आहे. सण जवळ आल्याने गृहोद्योग करणाऱ्यांनाही ऑर्डर देण्यात आली होती.
...
राख्यांचे नवे पॅटर्न
यंदा चायना राख्या बाजारात नसल्याने अन्य राख्यांना मागणी वाढली आहे. राख्यांचे नवे पॅटर्न आले आहेत. पिझा, बर्गर, चाॅकलेट आदींसारख्या डिझाइनच्या राख्यांसोबत बांबू, चांदीच्या राख्याही बाजारात आल्या आहेत. एडी, नग, माेती, रुद्राक्ष, स्वास्तिक, कार्टून, लाइटच्या राख्याही मुलांच्या पसंतीच्या ठरत आहेत.
...
परंपरागत राख्याही कायम
जुन्या डिझाइनच्या राख्यांनाही काही प्रमाणात मागणी आहे. मात्र ती कमी आहे. अलीकडे फोमच्या राख्यांचे चलन नाही. परंतु जरीच्या राख्या फोम आणि चमकीचा वापर करून तयार केल्या जात आहेत. अनेक दुकानदार आणि कारागीर अशा राख्या घरीच तयार करतात. वृद्धांकडून या राख्यांना पसंती आहे.
...
कोट
राखी सणाच्या महिनाभरापूर्वी आम्ही ऑर्डर नोंदवितो. कोरोना संक्रमण किती काळ चालेल याचा अंदाज नसल्याने यंदा ऑर्डर उशिरा दिल्या. आता प्रतिबंधात सूट मिळाली असून, दुकानांचा वेळही वाढल्याने समाधान आहे.
- अजय टाक्कामाेरे, राखी विक्रेता.
...