नागपूर जि.प.च्या ५४१ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 09:20 PM2019-11-22T21:20:14+5:302019-11-22T21:20:33+5:30
नागपूर जिल्हा परिषदेकडील गट क व ड वर्गातील तब्बल ५४१ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पदोन्नतीच्या पदाच्या कालबद्ध वेतनश्रेणीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकतेच जारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :- नागपूर जिल्हा परिषदेकडील गट क व ड वर्गातील तब्बल ५४१ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पदोन्नतीच्या पदाच्या कालबद्ध वेतनश्रेणीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकतेच जारी केले.
एकाच पदावर १०, २० व ३० वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांना पुढील पदोन्नतीच्या पदाची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे राज्य शासनाचे धोरण असून हे धोरण जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनादेखील लागू आहे, त्यास अनुसरून आदेश जारी करण्यात आले. यात उल्लेखनीय म्हणजे सर्व संवर्गाचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.
ज्या संवर्गाचे आदेश जारी करण्यात आले त्यामध्ये लघुलेखक-१, सहायक प्रशासन अधिकारी-१, कनिष्ठ प्रशासन अधिकारी - १५, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)- १४, वरिष्ठ सहायक - ७३, कनिष्ठ सहायक - १०४, परिचर/शिपाई - ३३२ असा एकूण ५४१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच ५४१ कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाकडील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे ही योजना लागू करण्याची प्रक्रिया सुरूच असून जिल्हा परिषदेने मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करून आघाडी घेतली आहे. ही योजना लागू झाल्यामुळे जि.प. कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरमहा दोन हजार ते सहा हजारपर्यंत वाढ होणार आहे शिवाय थकबाकीदेखील मिळणार आहे. याबद्दल कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी हा निर्णय जि.प. कर्मचाऱ्यांसाठी आनंददायी असल्याची भावना व्यक्त केली आहे.