बालभारतीच्या पुस्तकात काळाशी सुसंगत नवे बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 08:51 PM2018-06-26T20:51:39+5:302018-06-26T20:53:49+5:30
घोकमपट्टीला लगाम लावत कृतिशील अभ्यासक्रमाची पेरणी यावेळी बालभारतीच्या पुस्तकात दिसून येत आहे. भाषेच्या पुस्तकात व्यावहारिकता आणली आहे. सोपी भाषा, आकर्षक रंगसंगती आणि काळाशी सुसंगत असा बदल बालभारतीने यंदा पुस्तकात केला आहे. यावर्षी पहिली, आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. बदललेल्या अभ्यासक्रमात सर्व विषय हे कृतिशील केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घोकमपट्टीला लगाम लावत कृतिशील अभ्यासक्रमाची पेरणी यावेळी बालभारतीच्या पुस्तकात दिसून येत आहे. भाषेच्या पुस्तकात व्यावहारिकता आणली आहे. सोपी भाषा, आकर्षक रंगसंगती आणि काळाशी सुसंगत असा बदल बालभारतीने यंदा पुस्तकात केला आहे. यावर्षी पहिली, आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. बदललेल्या अभ्यासक्रमात सर्व विषय हे कृतिशील केले आहे.
काळानुरूप झालेले बदल, लैंगिक असमानतेचे मागासलेपण मागे टाकत घरातील आई कशी मॉर्डन झाली आहे, तिचे अस्तित्व चूल आणि मूल न राहता ती आता कॉम्प्युटरवर बसून कशी आॅनलाईन साहित्याची खरेदी करते आहे, अशा प्रकारचे अनेक चांगले बदल झाल्याचे जाणवते आहे. विद्यार्थ्यांना समजेल अशी सोपी भाषा, एखादी भूतकाळातील गोष्ट समजावण्यासाठी वर्तमान काळातील उदाहरणांचा केलेला वापर, टेक्नोलॉजी, इंटरनेट आदींचा दिलखुलास वापर या पुस्तकांमध्ये केलेला पहायला मिळत आहे. भूगोलाच्या पुस्तकात त्या देशाची आर्थिक, सामाजिक माहिती, लोकसंख्या, खनिज संपत्ती, नैसर्गिक साधने आदी माहिती दिली आहे.
गणिताच्या पुस्तकात नव्याने आलेल्या जीएसटीची माहिती देण्यात आली आहे. त्याबरोबरच शेअर्स, डिबेंचर्स, डिमॅट अकाऊंट काय असते, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज, विमा अशा सर्व संकल्पनांची तोंडओळख करून देण्यात आली आहे. राज्यशास्त्राच्या पुस्तकात सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. तसेच इंग्रजीच्या पुस्तकात व्यावहारिक भाषेचा समावेश केला आहे. रेल्वेचा फॉर्म कसा भरावा, ईमेल कसा करावा, व्यावहारिक संभाषण आदीला महत्त्व दिले आहे. यावर गुणसुद्धा आहे.
नवीन पुस्तकाची वैशिष्ट्ये
- सर्व पुस्तकांमध्ये क्यू आर कोड छापण्यात आला आहे.
- या पुस्तकांमध्ये भरपूर छायाचित्रांचा वापर केला आहे.
- डिजिटल पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक आणि सविस्तर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होणार
- शब्दसंपत्तीचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्वअध्ययन, चिकित्सक वृत्ती, निरीक्षण, निर्णयक्षमता, उद्योग-व्यवसायाशी निगडित शिक्षणावर भर
- मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन सोपे
यंदा प्रथमच बालभारती पाठ्यपुस्तकांबरोबर प्रत्येक विषयाची मूल्यमापन पद्धती कशी असेल याबाबतचा तपशील देणारी पुस्तिका देणार आहे. सर्व भाषा तसेच भाषेतर विषयांसाठी स्वतंत्र अशा मूल्यमापन पुस्तिकांची निर्मिती बालभारतीने केली आहे. या पुस्तिकेच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयाची ओळख, विषययोजना, कृतिपत्रिका, प्रश्नपत्रिका यांचे स्वरूप व निर्मितीचे निकष आणि त्याद्वारे मूल्यमापन कसे करावे याचा तपशील समजणार आहे. यामुळे दहावीच्या परीक्षेत नेमके काय येणार याचा तपशील विद्यार्थ्यांना या पुस्तिकेच्या आधारे मिळू शकणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करणे सोपे जाणार आहे.
नागपूर विभागात ५२ लाख ६३ हजार पुस्तकांचा पुरवठा
सर्वशिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचा पुरवठा करण्यात येतो. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातून यंदा ५२ लाख ६३ हजार २१४ पुस्तकांची मागणी आली होती. २३ जूनपूर्वी या सर्व पुस्तकांचा पुरवठा करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्रातून सांगण्यात आले.