टिमकीत थ रा र
By admin | Published: June 4, 2016 02:45 AM2016-06-04T02:45:09+5:302016-06-04T02:45:09+5:30
पती आणि मुलाची गळा कापून हत्या केल्यानंतर एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची थरारक घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिमकी भागात घडली आहे.
पती, मुलाची हत्या : पत्नीने लावला गळफास
नागपूर : पती आणि मुलाची गळा कापून हत्या केल्यानंतर एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची थरारक घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिमकी भागात घडली आहे. तब्बल १५ तासानंतर ही घटना उघडकीस आली. त्यामुळे टिमकी परिसरातील वातावरण सुन्न झाले आहे.
सरवर आलम ऊर्फ मोहम्मद अली मोहम्मद हारुन (वय अंदाजे ३५), दादू (वय अंदाजे ५ ते ६ वर्षे) आणि निशा ऊर्फ मनिषा कुशवाह (वय अंदाजे २५ ते ३० वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
हा परिवार मूळचा कानपूर (उत्तर प्रदेश) मधील रहिवासी आहे. प्रेमविवाह केल्यानंतर ते नागपुरात पळून आले. आठ महिन्यांपासून निशा आणि चिमुकल्या दादूसह सरवर आलम टिमकी पोलीस चौकीजवळच्या बॉम्बे चिकनवालाच्या चाळीत भाड्याने राहत होता. तो साड्यांवर कलाकुसर करायचा. मनासारखी मिळकत नसल्याने ते आर्थिक कोंडीचा नेहमीच सामना करायचे. परिणामी त्यांच्यात वाद व्हायचे.
अशात सरवरला दारूचीही सवय लागली होती. त्यामुळे अलीकडे त्यांच्या संसाराचे गणित बिघडले होते. गुरुवारी रात्री त्यांच्यात कोणता वाद झाला ते कळायला मार्ग नाही. शुक्रवारी सकाळपासून त्यांच्या खोलीचे दार उघडले गेले नाही. कुणी त्यांच्याकडे लक्षही दिले नाही. दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान सिलिंडरवाला घरी आला. बराच वेळ दार ठोठावूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने घराच्या खिडकीतून डोकावले. आतमधील थरारक दृश्य पाहून तो किंचाळला. ते ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनीही सरवर आलमच्या खोलीतील भयावह दृश्य बघितले. सरवर आणि त्याचा मुलगा दादू रक्ताच्या थारोळ्यात पडून होते तर, बाजूला मनिषा गळफास लावलेल्या अवस्थेत दिसत होती. हे पाहून शेजाऱ्यांनी तहसील ठाण्यात फोनवरून माहिती दिली.
ठाणेदार संतोष खांडेकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धावले. दार तोडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. आतमधील दृश्य शहारे आणणारे होते.
सरवर आणि चिमुकल्या दादूचा गळा कापलेला दिसत होता. बाजूलाच भला मोठा चाकू पडून होता. गांभीर्य लक्षात घेत त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यानुसार, सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा, गुन्हेशाखेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह बहुतांश वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हेशाखेचे पथक, ठसे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पोहचले.
पंचनामा आदी केल्यानंतर मृतदेह मेयोत पाठविण्यात आले. घटनास्थळावरील दृश्यावरून मनिषाने नवरा आणि चिमुकल्याची गळा कापून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला.(प्रतिनिधी)
जल्लाद जप्त !
घटनास्थळी दोघांचे गळे कापणारा भला मोठा चाकू पोलिसांना सापडला. एवढेच नव्हे तर ‘जल्लाद’ नावाच्या कीटकनाशकाची बाटली अन् दारूची बाटली तसेच कागदपत्रे सापडली. पोलिसांनी ती जप्त केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला असून, घटनास्थळी रात्रीपर्यंत मोठ्या संख्येत बघ्यांची गर्दी होती. माहिती कळल्यानंतर गर्दीतील प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत होता. दरम्यान, तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शवविच्छेदनानंतरच या घटनेतील आरोपी कोण ते स्पष्ट होईल, असे तहसीलचे ठाणेदार खांडेकर यांनी सांगितले.