मद्यमाफियांसाठी काम करणारा टिप्परचालक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 01:14 AM2018-12-30T01:14:16+5:302018-12-30T01:16:55+5:30

आरोग्यास घातक असलेले परप्रांतातील प्रतिबंधित मद्य ब्रॉण्डेड कंपन्यांच्या बाटल्यात घालून त्याची सर्रास विक्री करणाऱ्या मद्यमाफियांवरच्या कारवाईवर संशय व्यक्त करणारे तसेच टिप्परच्या वाहनचालकाचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करणारे वृत्त लोकमतने शनिवारी प्रकाशित करताच सर्वत्र खळबळ उडाली. त्यानंतर ज्या टिप्परमध्ये २०० पेट्या दारू आढळली त्या टिप्परचा बेपत्ता असलेला चालक-मालक शोधून त्याला अटक करण्यात धंतोली पोलिसांनी शनिवारी यश मिळविले. संदीप रंगराव वऱ्हाडे (वय २७, रा. नरसाळा) असे त्याचे नाव आहे. वऱ्हाडेच्या अटकेमुळे बनावट दारू निर्मिती आणि मद्यतस्करीत गुंतलेल्या अनेकांची नावे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Tipper driver who work for liquor mafia arrested | मद्यमाफियांसाठी काम करणारा टिप्परचालक गजाआड

मद्यमाफियांसाठी काम करणारा टिप्परचालक गजाआड

Next
ठळक मुद्देतीन दिवस होऊनही सूत्रधार मोकाट : जामिनासाठी धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरोग्यास घातक असलेले परप्रांतातील प्रतिबंधित मद्य ब्रॉण्डेड कंपन्यांच्या बाटल्यात घालून त्याची सर्रास विक्री करणाऱ्या मद्यमाफियांवरच्या कारवाईवर संशय व्यक्त करणारे तसेच टिप्परच्या वाहनचालकाचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करणारे वृत्त लोकमतने शनिवारी प्रकाशित करताच सर्वत्र खळबळ उडाली. त्यानंतर ज्या टिप्परमध्ये २०० पेट्या दारू आढळली त्या टिप्परचा बेपत्ता असलेला चालक-मालक शोधून त्याला अटक करण्यात धंतोली पोलिसांनी शनिवारी यश मिळविले. संदीप रंगराव वऱ्हाडे (वय २७, रा. नरसाळा) असे त्याचे नाव आहे. वऱ्हाडेच्या अटकेमुळे बनावट दारू निर्मिती आणि मद्यतस्करीत गुंतलेल्या अनेकांची नावे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, प्रतिबंधित तसेच बनावट मद्याची तस्करी करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाºया मद्यतस्करांना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अद्याप अटक केलेली नाही, त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धावपळ चालविली आहे.
आरोग्याला घातक असल्यामुळे काही प्रांतातील मद्य आयात करण्यास आणि विकण्यास राज्य सरकारने महाराष्ट्रात प्रतिबंध घातला आहे. हे घातक मद्य मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि हरियाणासह काही राज्यात अत्यंत स्वस्त दरात विकत मिळते. उत्पादन शुल्क विभागाच्या आणि पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून काही मद्यमाफिया हे प्रतिबंधित मद्य नियमित नागपुरात आणतात. त्यात घातक तसेच सुगंधी रसायन मिसळवून ते विशिष्ट ब्रॅण्डेड मद्य कंपनीच्या रिकाम्या बॉटलमध्ये घातले जाते आणि हे घातक मद्य ब्रॅण्डेड कंपनीचे आहे, असे भासवून मद्यमाफिया ते बार, वाईन शॉपमध्ये पोहोचवितात. धंतोली आणि पाचपावलीतील मद्यमाफिया गेल्या अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा करीत आहे. त्यातून राज्य शासनाचा वर्षाचा कोट्यवधींचा महसूल बुडविला जातो आणि मद्यपींच्या आरोग्याशी खेळून रोज लाखोंची उलाढाल केली जाते. त्यातील काही हिस्सा पोलीस तसेच काही हिस्सा उत्पादन शुल्क विभागातील काही भ्रष्ट मंडळींच्या घशात जात असल्याने या माफियावर कारवाई होत नाही. मंगळवारी मध्यरात्री संशयावरून धंतोलीचे ठाणेदार दिनेश शेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टिप्पर(एमएच ३१/ सीक्यू २६२१९)ची तपासणी केली. त्यात देशीदारूच्या २०० पेट्या सापडल्यामुळे बाजूच्या गोदामावर नजर रोखण्यात आली. बुधवारी उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने धंतोलीतील सम्राट एजन्सीच्या गोदामावर छापा टाकण्यात आला.
गोदामात दारूच्या पेट्या, खाली बॉटल्स आणि झाकणे सापडली. बाजूला एक वाहनही आढळले. चौकशीत या गोदामात बनावट मद्य निर्मिती (रि-बॉटलिंग) होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून धंतोली पोलिसांनी पळून गेलेला टिप्पर चालक-मालकावर गुन्हा दाखल केला. तीन दिवस त्याची शोधाशोध करून पोलिसांनी त्याला शनिवारी सकाळी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करून त्याचा दोन दिवसांचा पीसीआरही मिळवला. त्यामुळे आता मद्यतस्करी आणि बनावट मद्य निर्मितीतील बड्यांची नावे उघड होण्याचे संकेत धंतोलीचे ठाणेदार दिनेश शेंडे यांनी दिले आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अमरिश जयस्वाल, संजित जयस्वाल आणि प्रशांत जयस्वालविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, चार दिवस होऊनही या तिघांना अटक करण्यात उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला यश आले नाही.
अनेकांची भूमिका संशयास्पद
बनावट मद्यनिर्मिती आणि तस्करीच्या प्रकरणातील आरोपी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धावपळ करीत असून, या विभागातील काही भ्रष्ट मंडळी त्यांना मदत करीत असल्याची धक्कादायक चर्चा सर्वत्र सुरू आहे. या प्रकरणात अनेकांची भूमिका संशयास्पद असल्याचेही संबंधित वर्तुळातून ऐकू येते. त्यासंबंधाने लोकमत प्रतिनिधीने कारवाईची माहिती जाणून घेण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्याशी वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून शुक्रवारी आणि शनिवारीदेखील प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी करणारे उत्पादन शुल्क विभागाचे तपास अधिकारी चौधरी यांनी आमचा तपास सुरू आहे. जयस्वाल यांचा बंगला आणि प्रतिष्ठानांचीही आम्ही तपासणी केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

Web Title: Tipper driver who work for liquor mafia arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.