चार तालुक्यातील तूर खरेदी केंद्र केले बंद
By admin | Published: February 18, 2017 12:23 AM2017-02-18T00:23:33+5:302017-02-18T00:23:33+5:30
खुल्या बाजारात तुरीचे दर घसरल्याने शेतकरी तूर विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्रांकडे वळले
भाव पडल्याने शेतकऱ्यांच्या हातावर तुरी : कमी दरात शेतमाल विकण्याची वेळ
यवतमाळ : खुल्या बाजारात तुरीचे दर घसरल्याने शेतकरी तूर विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्रांकडे वळले. मात्र जागेअभावी चार तालुक्यांतील तूर खरेदी केंद्रच बंद करण्याचा निर्णय झाला. त्याचा जबर फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
यावर्षी तुरीचे दर निम्यावर आले आहे. धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी आपली तूर नाफेडच्या खरेदी केंद्राकडे नेण्यास सुरूवात केली. नाफेडचे तुरीचे दर प्रती क्विंटल ५०५० रूपये आहे. खासगी बाजारात हेच दर ३८०० ते ४५०० रूपयांपर्यत खाली घसरले आहे. यामुळे शासकीय खरेदी केंद्राकडे तूर नेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. आता या केंद्रातील तूर साठवणुकीची क्षमता संपली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चार खरेदी केंद्र शुक्रवारपासून बंद करण्यात आले आहे.
जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेले सर्वात महत्वाचे यवतमाळ केंद्रही बंद झाले आहे. सोबतच राळेगाव, बाभूळगाव व आर्णी येथील केंद्र बंद करण्यात आले. या केंद्रांवर तूर विकण्यासाठी दोन हजार शेतकरी वेटींगवर आहे. या केंद्रांवर शेतकऱ्यांची तूर येऊन पडला आहे. मात्र जागाच नसल्याने त्या तुरीची उचल होणार नसल्याचे विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने स्पष्ट केले. शासकीय खरेदी केंद्राच्या आशेवर असलेले शेतकरी आता चांगलेच अडचणीत सापडले आहे. या चार केंद्रांवर आत्तापर्यंत १० हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली. आणखी एक लाख क्विंटपेक्षा जास्त तूर या केंद्रावर येण्याची शक्यता आहे.
तूर साठवणुकीसाठी जागा नसल्याने पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी जागा उपलब्ध करून देण्यास होकार दिला. मात्र अद्याप जागा मिळाली नाही. यामुळे तूर खरेदी केंद्र शुक्रवारी अखेर बंद करण्यात आले.
संपूर्ण भिस्त मार्केटींग फेडरेशनवर
विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे चार खरेदी केंद्र बंद झाले. १० खरेदी केंद्र सुरू आहेत. यात वणी केंद्राची स्थिती बिकट आहे. हे केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. पुसद, दिग्रस, उमरखेड, नेर, दारव्हा, कळंब, पांढरकवडा, घाटंजी व मुकुटबन कें द्र कसे तरी सुरू आहे. या १० केंद्रांवर आत्तापर्यंत २१ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली. तेथे दररोज २१०० क्विंटलची आवक होत आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत जात आहे. (शहर वार्ताहर)