‘चुल्लूभर पाण्यात बुडून मरावे’; महाविकास आघाडीवर टीका करताना बावनकुळेंची जीभ घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 07:40 PM2022-07-20T19:40:55+5:302022-07-20T19:41:39+5:30
Nagpur News शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसी समाजाला न्याय मिळाल्याचा दावा करीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या जुन्या सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप लावला.
नागपूर : राज्य सरकारने सादर केलेला बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसी समाजाला न्याय मिळाल्याचा दावा करीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या जुन्या सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप लावला. मागील सरकारमधील नेत्यांवर टीका करीत असताना त्यांची जीभ घसरली व संबंधितांनी ‘चुल्लूभर पाण्यात बुडून मरावे,’ अशा भाषेचा त्यांनी उपयोग केला.
बावनकुळे बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मागील अनेक महिन्यांपासून हा संघर्ष सुरू होता. मागील सरकार ओबीसी आरक्षणाबाबत उदासीन होते. जुने सरकार असते तर ओबीसी त्यांच्या हक्काची लढाई जिंकू शकले नसते. ओबीसींना न्याय द्यायचाच नाही, असेच मागील सरकारने ठरविले होते. त्यांनी अडीच वर्षे केवळ वेळकाढूपणा केला. त्यांचे सरकार असते तर बांठिया आयोगाचा अहवाल आल्यावरदेखील तो दाबूनच ठेवला असता. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झारीतील शुक्राचार्य होते. ओबीसींची फसवणूक करणाऱ्या नेत्यांना ओबीसी जनता सोडणार नाही. त्या नेत्यांनी मौन पाळावे व आता ‘चुल्लूभर पाण्याच डुबून मरावे,’ अशा शब्दांत बावनकुळे यांनी टीका केली.
उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्या सरकारला जावे लागले आणि शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानेच ओबीसींना न्याय मिळाला आहे. नवीन सरकारने पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाबाबत आढावा घेतला व आवश्यक पावले उचलली. देवेंद्र फडणवीस, भाजप, ओबीसी संघटना यांनी मागील अडीच वर्षांत जो संघर्ष केला त्यातूनच हा विजय मिळाला आहे, असेदेखील ते म्हणाले.