छळाच्या आगीतून सुटण्यासाठी, तिची फुफाट्यात पडण्याची होती तयारी !
By नरेश डोंगरे | Published: May 11, 2024 11:57 PM2024-05-11T23:57:55+5:302024-05-11T23:59:52+5:30
समुपदेशनानंतर तिचे आक्रंदन थांबले, ती शांत झाली : टीसींच्या प्रसंगावधानतेमुळे सपनाचे भविष्य सुरक्षित.
नागपूर : नेहमीसारखी घाईत नागपूरकडे निघालेल्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये एक १६ वर्षीय सुस्वरूप मुलगी अंग चोरून बसलेली पाहून टीसी तिला तिकिट विचारतो. ती गोंधळते, गप्पच बसणे पसंत करते. तिच्याकडे तिकिट नसते. ती बोलत नसली तरी तिची केविलवाणी स्थिती बरेच काही सांगून जाते. अनुभवी टीसीच्या ते लक्षात येते. विश्वासात घेऊन तिला विचारपूस केली जाते अन् एका मुलीची छळकथा उजेडात येते. छळाचे चटके असह्य झाल्याने ती त्या आगीतून सुटका करून घेण्यासाठी फुफाट्यात पडण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होते.
घटना ट्रेन नंबर १२०६९ जनशताब्दी एक्सप्रेसमधील आहे. आज दुपारी २ च्या सुमारास डोंगरगड रेल्वे स्थानकावरून गाडी पुढे निघाल्यानंतर तिकिट तपासणीस (टीसी) सतीश कुमार यांनी जनरल कोचमध्ये प्रवाशांच्या तिकिटा तपासणे सुरू केले. डब्यात फारशी गर्दी नव्हती. एका कोपऱ्यात सुस्वरूप सपना (काल्पनिक नाव, वय १६ वर्षे) बसून होती. सतीशकुमार यांनी तिला तिकिट दाखवण्यास सांगितले. तिचा प्रतिसाद शून्य होता. गोंधळलेल्या अवस्थेतील सपना काहीच सांगण्या-बोलण्यास तयार नसल्याने टीसींना संशय आला. महिला प्रवाशाच्या मदतीने त्यांनी सपनाची विचारपूस सुरू केली. प्रश्नांची सरबत्ती झाली, विनातिकिट प्रवास करणे गुन्हा आहे, कारवाई होऊ शकते, हे सांगितल्यानंतर ती गलबलली. स्वत:चे नाव, पत्ता सांगताना जबलपूरला राहतो, असेही सांगितले. दहावीची परिक्षा दिली आहे. काका-काकूंकडून खूप छळ होतो. तो असह्य झाल्याने दिल्लीला राहणाऱ्या नातेवाईकाकडे निघाली, असे सांगते. जवळ एक पैसा नाही, दिल्लीत नातेवाईक कुठे राहतात, त्यांचा संपर्क नंबर काय, त्याची कसलीही माहिती नाही, मात्र दिल्लीलाच जायचे आहे, असा तिचा अट्टहास असतो. छळाच्या आगीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी ती फुफाट्यात अडकणार असल्याचे लक्षात येताच प्रवाशांच्या मदतीने टीसी सतीशकुमार यांनी हा प्रकार वाणिज्य नियंत्रकांच्या माध्यमातून चाईल्ड वेलफेअर कमिटीला (सीडब्ल्यूसी) कळविला. रेल्वे सुरक्षा दलालाही माहिती देण्यात आली. दरम्यान, वायुवेगात नागपूरकडे धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस डोंगरगड स्थानकावरून गोंदिया स्थानकावर पोहचली. येथे टीसी सतीशकुमार यांनी महिला प्रवाशांच्या मदतीने आरपीएफ तसेच सीडब्ल्यूसीने सपनाला उतरवून घेतले.
परत काकांकडे जायचे नाही !
काहीही झाले तरी चालेल मात्र परत तो छळ सहन करण्यासाठी काका-काकूंकडे जाणार नाही, असे सपना आक्रंदून सांगत होती. मला दिल्लीला जाऊ द्या, अशी विनवणी करीत होती. सीडब्ल्यूसीच्या सदस्यांनी तिचे समुपदेशन केले. दिल्लीतील नातेवाईकांचा पत्ता लागेपर्यंत तुला सुरक्षित शेल्टरमध्ये ठेवले जाईल. तुला तेथे पाहिजे ते शिकता येईल, पाहिजे ते बनता येईल, असेही पटवून देण्यात आले. त्यानंतर तिचे आक्रंदण थांबले, ती शांत झाली. टीसींच्या प्रसंगावधानतेमुळे काळोखाच्या गर्तेत जाण्यापासून सपनाचे भवितव्य सुरक्षित झाले.