पळून जाण्यासाठी पोलिसाचा दाबला गळा, चावा घेऊन गुप्तांगावर मारली लाथ
By दयानंद पाईकराव | Published: March 16, 2024 04:19 PM2024-03-16T16:19:40+5:302024-03-16T16:21:07+5:30
घटना मेयो रुग्णालयात शुक्रवारी घडली असून पोलिसांनी आरोपीला पकडून त्याच्या विरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर : मेयो रुग्णालयात तपासणीसाठी नेलेल्या आरोपीने दोन पोलिसांना चावा घेतला व एका पोलिसाच्या गुप्तांगावर लाथ मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीत मेयो रुग्णालयात शुक्रवारी घडली असून पोलिसांनी आरोपीला पकडून त्याच्या विरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
मुस्ताक उर्फ मुन्ना अहमद पटेल (४८, रा. प्रधानमंत्री आवास योजना, संघर्षनगर यशोधरानगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला सदर पोलिसांनी कलम ३९४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली होती. आरोपीची पोलिस कोठडी शुक्रवारी १५ मार्चला संपल्यामुळे पोलिस अंमलदार मोहनसिंग ठाकुर, हवालदार राजेश कोचे, धनपत मंझरेटे, राजेंद्र वानखेडे आणि महिला पोलिस मेघा हे त्याला मेयो रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले होते. तेथे मोहनसिंग ठाकुर यांनी एमएलसी कार्ड काढून आरोपीला वैद्यकीय अधिकाऱ्याकडे नेले. परंतु आरोपीने वैद्यकीय अधिकाऱ्याला ‘मला तुमचा कडे तपासणी करायची नाही, तूमच्या वरिष्ठांकडे मला तपासणी करायची आहे’ असे जोरजोरात बोलून अश्लील शिविगाळ केली. त्यामुळे ठाकुर आणि इतर पोलिसांनी त्याला व्हरांड्यात नेऊन समजविण्याचा प्रयत्न केला.
तेथे आरोपी मुन्नाने धनपत मंझरेटे यांना धक्का मारून दंडाला बांधलेली दोरी सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला पकडून मेयो रुग्णालयातील पोलिस बुथमध्ये नेले. तेथे आरोपीने मंझरेटे यांच्या हाताला चावा घेऊन त्यांच्या गुप्तांगावर लाथ मारली. त्यानंतर मुन्नाने पोलिसांना जिवे मारण्याची धमकी देऊन ठाकुर यांचा दोन्ही हाताने गळा दाबला. त्यावेळी इतर पोलिस आणि मेयोचे सुरक्षा रक्षक मदतीसाठी धावले असता मुन्नाने त्यांनाही चावा घेऊन आपले डोके भिंतीवर आपटले व स्व:तला जखमी केले. या प्रकरणी तहसिल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रमिझ शेख यांनी आरोपी विरुद्ध कलम ३०७, ३५३, ३३२, २९४, ५०६, ३०९ नुसार गुन्हा दाखल केला.