मोझॅक अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार - कृषीमंत्री धनंजय मुंडे
By कमलेश वानखेडे | Published: October 2, 2023 03:04 PM2023-10-02T15:04:16+5:302023-10-02T15:04:37+5:30
नागपर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी
नागपूर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सोबतच मोझॅक अळीमुळेही नुकसान झाले. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या येत्या बैठकीत पीक विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. एसडीआरफ, एनडीआरएफ व पीक विमा या तिहेरी मानकावर मदत केली जाईल, असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील अड्याळी व उमरगाव (नागपूर तालुका), पाचगाव, चांपा व गावसुत (उमरेड तालुका), चाफेगडी, मोहगाव, चिचघाट (कुही तालुका) वडना, मोहखेडी व पावडदवना (मौदा तालुका) या अतिवृष्टीग्रस्त भागाची कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मुंडे म्हणाले, जून महिन्यात सहा तालुक्यात ६५ मि.मी. पाऊस होऊन नुकसान झाले आहे. ८२ पैकी ६२ मंडळ जून आणि सप्टेंबरच्या दोन्ही अतिवृष्टीमुळे बाधित झालेले आहे.
सुरुवातीच्या पेरणीनंतर अतिवृष्टी झाल्याने त्याचे सप्टेंबरमध्ये मंडळात पाच ते सहा वेळा अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचा मोठा परिणाम म्हणून पिकांचे नुकसान झाले आहे. या भागाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. एक रुपया पीक विम्यातून जेथे शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व दुष्काळ मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना पीक विम्यातून अंतरिम मदत २५ टक्के मदत पीकविमा कंपनी कडून दिली जाणार आहे. २०२१-२२ च्या नुकसान भरपाईची जी शासकीय मदत प्रलंबित आहे ती शेतकऱ्यांना लवरच हस्तांतरित केली जाईल. पुढच्या पाच ते सहा महिन्यानंतर संपूर्ण राज्यात ई- पंचनामे प्रक्रिया राबवली जाईल. अतिवृष्टी असो की नैसर्गिक आपत्ती सर्वांसाठी राज्यात ई पंचनामे सुरु होईल, असेही त्यांनी सांगितले.
कांद्याचा भाव ज्या ज्या वेळेस पडला साडेतीनशे कोटी रुपये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून दिले. कांद्याचे भाव स्थिर रहावे यासाठी अतिरिक्त निर्यात कर लावण्यात आले. देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत २४१० रुपये कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांसाठी भाव जाहीर केला. एक लाख टनाची खरेदी शासकीय यंत्रणेने केली, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री असलो तरी माझ्यातला कार्यकर्ता मरू देत नाही
- मागील दहा वर्षांपासून ताईसुद्धा (सुप्रिया सुळे) राजकारणात आहेत. आता दोष कुणाला द्यायचा. पक्षाचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. भूमिका त्यांच्याकडे होत्या. विदर्भात सुरवातीपासून १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण झाला, पण वाटते तेवढी ताकद निर्माण झाली नाही, हे मान्य करावे लागेल. संघटन म्हणून मी आज मंत्री असलो तरी माझ्यातला कार्यकर्ता मरू देत नाही. याचे मंथन होणे आवश्यक आहे, असा टोलाहीत्यांनी लगावला.