उपराजधानीत राजरोसपणे विकला जातोय तंबाखू व खर्रा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 11:05 AM2019-11-13T11:05:41+5:302019-11-13T11:11:10+5:30

राज्यात प्रतिबंधित तंबाखूचे उत्पादन होत नसले तरीही लगतच्या राज्यातून नागपुरात कोट्यवधी रुपयांच्या तंबाखूची अवैध वाहतूक होते.

Tobacco and kharra are being sold in the Nagpur | उपराजधानीत राजरोसपणे विकला जातोय तंबाखू व खर्रा!

उपराजधानीत राजरोसपणे विकला जातोय तंबाखू व खर्रा!

googlenewsNext
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन विभागाचा वचक नाही अन्य राज्यातून आवकीवर नियंत्रण नाही

मोरेश्वर मानापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाईच्या नावाखाली महिन्यात एक वा दोनदा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व खर्रा विक्रेत्यांवर धाडी टाकतात. राज्यात प्रतिबंधित तंबाखूचे उत्पादन होत नसले तरीही लगतच्या राज्यातून नागपुरात कोट्यवधी रुपयांच्या तंबाखूची अवैध वाहतूक होते. तंबाखूची विक्री करणाऱ्यांना कुणाचा पाठिंबा आहे, हा आर्थिक व्यवहार समजण्यापलीकडे आहे. त्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागही दुर्लक्ष करीत असून नागपुरातील गोरखधंदा विभागाच्या नाकावर टिच्चून होत असल्याची माहिती आहे. प्रौढ व्यक्तींमध्ये तंबाखू खाणाऱ्यांचे व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण अधिक असून आता हे लोण लहान मुलांमध्येही पोहोचले आहे. तंबाखूजन्य पदार्थाचे उत्पादन, साठवणूक व विक्री करण्यावर राज्य शासनाने बंदी घातली असली तरी, योग्य अंमलबजावणी होत नसल्याने त्याचा ‘फज्जा’ उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.

मोठ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी
विभागाने पानटपऱ्यांसह लाखो रुपयांच्या तंबाखूचा साठा करून विक्री करणाऱ्या मोठ्या विक्रेत्यांवर धाडी टाकाव्यात. तंबाखू वितरणाचे मोठे स्रोत बंद करावेत. त्यामुळे पानटपरी चालकांना तंबाखूच मिळणार नाही. कमी स्टॉफ असण्याचा कारणांवरून अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयाबाहेरच निघत नाही. शिवाय माहितीच्या आधारे बाहेर पडले तर केवळ बोटावर मोजण्याइतपत पानटपऱ्यांवर कारवाई करून मोकळे होतात. ही विभागाची नित्याचीच बाबत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पानटपरीचालकांना धाक नाही
विभागातर्फे नियमित कारवाया होत नसल्यामुळे प्रतिबंधित तंबाखूयुक्त खर्ऱ्याची विक्री करणाऱ्या पानटपरीचालकांना अधिकाऱ्यांचा धाक उरला नाही. कारवाईची माहिती होताच चालक टपरी बंद करतात. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या हाती काहीही लागत नाही. केवळ दंडात्मक कारवाई नव्हे तर युवकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या टपरीचालकांकडून हजारांनी दंड वसूल करण्याची गरज आहे, तरच तंबाखूच्या विक्रीवर काही प्रमाणात आळा बसेल. वर्षापूर्वी वरिष्ठांच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांनी टपरीला सील लावण्याच्या कठोर कारवाईनंतर पानटपरी चालकांमध्ये दहशत पसरली होती. अनेकांनी पानटपऱ्या बऱ्याच दिवसांपर्यंत उघडल्या नव्हत्या. कारवाईनंतर थोडासा दंड आकारण्यापलीकडे विभाग काहीच करीत नसल्यामुळे पानटपरीचालकांमध्ये अधिकाऱ्यांचा धाकच उरला नसल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले. सन २०१९ मध्ये केवळ माहितीच्या आधारे दुकानदारांकडून प्रतिबंधिक तंबाखू जप्त करण्याशिवाय नागपुरातील हजारो पानटपऱ्यांवर कारवाईच केली नसल्याची माहिती आहे.

तंबाखूमध्ये अतिविषारी रसायने
तंबाखू आणि तंबाखूच्या धुरात अतिविषारी रसायने सापडतात. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, गर्भाशय, मुखाचा कर्करोग होतो. तंबाखूच्या सेवनाने त्यातील निकोटिनच्या प्रभावामुळे मेंदूचे कार्य थांबते. मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होते. तसेच जे लोक धूम्रपान करतात त्यांना हृदयघात होण्याची शक्यता अधिक असते. भारतातील प्रत्येक तिसरी व्यक्ती तंबाखूचे सेवन अथवा धूम्रपान करतो.

दररोज खºर्याचा लाखोंचा व्यवसाय
प्रतिबंधित तंबाखू बिनादिक्कत नागपुरात मोठ्या प्रमाणात विक्रीला येतो आणि गोदामांमध्ये साठविला जातो. तसेच विशिष्ट विक्रेत्यांच्या माध्यमातून पानटपरीवर वितरित होतो. नागपुरात गल्लोगल्ली आणि चौकाचौकात तीन हजारांपेक्षा जास्त पानटपऱ्या सुरू असून त्यावर सुगंधित तंबाखूयुक्त खर्ऱ्याची सर्रास विक्री होत असल्याचे लोकमत प्रतिनिधीला पाहणीदरम्यान आढळून आले. काही पानटपऱ्या हॉस्पिटललगत आणि लोकवस्तीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय असो वा विभागीय कार्यालय सर्वच शासकीय कार्यालयांच्या परिसरात खर्रा विकला जातो. धंतोली, महाल, रेशीमबाग, मानेवाडा, इतवारी, गांधीबाग बाजारपेठेत रात्रीपर्यंत सुरू असणाऱ्या पानटपऱ्यांवर सुगंधित तंबाखू टाकून पानांची विक्री करण्यात येते. या ठिकाणी सर्व ब्रॅण्डचा तंबाखू ग्राहकांना सहज उपलब्ध होतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी लोकमतशी बोलताना केली.

शाळा, कॉलेजजवळ तंबाखूची विक्री
सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने विक्री कायदा २००३ मधील कलम ६ (ब) नुसार कोणतीही शाळा, महाविद्यालय वा शिक्षण संस्थेच्या १०० मीटर परिघामध्ये तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीला बंदी आहे. यात सिगारेटचाही समावेश आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरातील बहुतेक महाविद्यालयांजवळील पानटपरीवर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री सर्रास होताना दिसते.

धाडीची कारवाई निरंतर प्रक्रिया
विभागाच्यावतीने प्रतिबंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांवर निरंतर कारवाई करण्यात येते. धाडीची कारवाई ही विभागाची निरंतर प्रक्रिया आहे. पानटपऱ्यांना सील लावण्याच्या कारवाईनंतर चालकांमध्ये धडकी भरली होती. नागरिकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या विक्रेत्यांवर आता धडक मोहीम राबविण्यात येणार आहे.
शरद कोलते, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग.

Web Title: Tobacco and kharra are being sold in the Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.