तंबाखू सेवन विरोधी दिवस; तंबाखूमुळे दरवर्षी सव्वा लाख बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 09:44 AM2019-05-31T09:44:45+5:302019-05-31T09:47:05+5:30
भारतात दरवर्षी तंबाखूच्या सेवनामुळे ८५ हजार लोकांना तोंडाचा कर्करोग होतो तर बिडीमुळे ७३ हजार लोक फुफ्फुसाच्या कर्करोगांना बळी पडतात.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात दरवर्षी तंबाखूच्या सेवनामुळे ८५ हजार लोकांना तोंडाचा कर्करोग होतो तर बिडीमुळे ७३ हजार लोक फुफ्फुसाच्या कर्करोगांना बळी पडतात. साधारण १ लाख ६० हजार कर्करोगाचे नवीन रुग्ण आढळून येतात. यातील १ लाख २५ हजार लोकांचा या आजाराने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
संगत म्हणा, ‘स्टाईल स्टेटमेंट’ म्हणा किंवा केवळ उत्सुकतेतून केलेला प्रयोग म्हणा, मात्र तंबाखू आणि सिगरेटच्या नादाला लागून प्रौढांसोबतच युवावर्गाचा ºहास होत आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार तंबाखूच्या व्यसनामुळे युवकांना कर्करोग होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.विशेष म्हणजे या व्यसनामध्ये अडकणाऱ्या अनेकांना याचे दुष्परिणाम माहीत आहेत. तरीदेखील तरुणवर्गात तंबाखू सेवनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे कर्करोग विभागाचे डॉ. कृष्णा कांबळे यांनी सांगितले, भारतात दरवर्षी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग रुग्णात १० टक्क्यांनी वाढ होत आहे. एकट्या नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात ४०-४५ टक्के रुग्ण दिसून येत आहे. तंबाखूमुळे भारतात वर्षाकाठी साधारण ८५ हजार रुग्ण तोंडाच्या कर्करोगाने तर बीडी व सिगारेटमुळे ७३ हजार रुग्ण फुफ्फुसाच्या कर्करोगाला बळी पडत आहे. यात महिलांचे प्रमाणही वाढत आहे.
तंबाखूमधील ६९ घटक देतात कॅन्सरला आमंत्रण-डॉ. मानधनिया
कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया म्हणाले, तंबाखूमध्ये ४ हजार ८०० रासायनिक घटक असतात. यातील ६९ घटक कॅन्सरला आमंत्रण देणारे असतात. कॅन्सरशिवाय तंबाखू हे हृदयरोग, पक्षाघात, अस्थमाचेही मुख्य कारण ठरत आहे. हे व्यंधत्व, पेप्टीक अल्सर यालाही कारणीभूत ठरते. धूम्रपानामुळे रक्तामधील आॅक्सिजनची मात्रा कमी होते.
गेल्या वर्षी मुखकर्करोगाचे १५१ रुग्ण-डॉ. गणवीर
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांच्यानुसार, तंबाखूमुळे होणाºया कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. शा. दंत रुग्णालयात २०१३ मध्ये मुखकर्करोगाचे ६८ रुग्ण, २०१४ मध्ये ८१ रुग्ण, २०१५ मध्ये १३४ रुग्ण, २१०६ मध्ये १९० रुग्ण, २०१७ मध्ये ७८ रुग्ण तर गेल्या वर्षी २०१८ मध्ये १५१ रुग्णांची नोंद झाली आहे. यात युवकांची संख्या सर्वाधिक आहे.
तंबाखूची अखाद्य पदार्थ म्हणून नोंद व्हावी-डॉ. कांबळे
डॉ. कांबळे म्हणाले, भारतात खाद्य पदार्थांमध्ये तंबाखूचीही नोंद आहे. शासनाने याला अखाद्य पदार्थ म्हणून याची नोंद करावी व जास्तीत जास्त कर आकारावा. दारु, तंबाखूच्या उत्पन्नातून शासनाला मिळणारा एका वर्षाच्या करातून नवीन अद्ययावत कर्करोग रुग्णालय स्थापन करावे. कर्करोगाच्या वेदनेवर ती फुंकर ठरेल.