तंबाखूमुळे ४१ ते ५० वयोगटात तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण ३२ टक्के, कॅन्सर हॉस्पिटलचा अभ्यास
By सुमेध वाघमार | Published: April 16, 2024 06:33 PM2024-04-16T18:33:08+5:302024-04-16T18:33:47+5:30
...यात ४० ते ५० वयोगटात हा कॅन्सर होण्याचे प्रमाण सर्वाधिक ३२ टक्के होते. तंबाखू आणि सिगरेटच्या नादाला लागून युवावर्गाचा ऱ्हास होत असल्याचे या आकडेवारी दिसून येते.
नागपूर : तंबाखूच्या व्यसनामुळे युवकांना कर्करोग होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (आरएसटी) कॅन्सर हॉस्पिटलने २०१९ ते २०२२ या वर्षांतील ११ हजार २०१ कॅन्सर रुग्णांचा अभ्यास केला असता यातील ३२ टक्के म्हणजे, ३ हजार ५४१ रुग्णांना तोंडाचा कॅन्सर होता. यात ४० ते ५० वयोगटात हा कॅन्सर होण्याचे प्रमाण सर्वाधिक ३२ टक्के होते. तंबाखू आणि सिगरेटच्या नादाला लागून युवावर्गाचा ऱ्हास होत असल्याचे या आकडेवारी दिसून येते.
तंबाखूजन्य पदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या व्यसनामध्ये अडकणाऱ्या अनेकांना याचे दुष्परिणाम माहीत आहेत. मात्र तरीदेखील तरुणवर्गात तंबाखू सेवनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ‘आरएसटी’ कॅन्सर हॉस्पिटल’ने तीन वर्षांतील कॅन्सर रुग्णांचा अभ्यास केला असता त्यात तोंडाचा कॅन्सर आघाडीवर असल्याचे आढळून आले. वयोगटानुसार हा कॅन्सर ४१ ते ५० वयोगटात ३२ टक्के, ३१ ते ४० वयोगटात २९ टक्के तर ५१ ते ६० वयोगटात २२ टक्के असल्याचे दिसून आले. हा अभ्यास आरएसटी कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. करतार सिंग, मानद सल्लागार डॉ. बी.के. शर्मा, ईएनटी आॅन्कोसर्जन डॉ.अनिरुद्ध वाघ, संशोधन शास्त्रज्ञ डॉ. रेवु शिवकला यांच्यासह कॅन्सर नोंदणी विभागाने केला.
-७७ टक्के पुरुष तर २३ टक्के महिलांना मुखाचा कॅन्सर
अभ्यासात तोंडाचा कॅन्सर असलेल्या ३ हजार ५४१ रुग्णांमध्ये ६८ टक्के रुग्ण तंबाखूचे सेवन करत असल्याचे आढळून आले. या शिवाय ३८ टक्के पान मसाल्याचे, ३५ टक्के खर्राचे, १४ टक्के धूम्रपानाचे, १३ टक्के सुपारीचे पान तर १२ टक्के बिडीचे सेवन करतात. मुखाचा कॅन्सरमध्ये ७७ टक्के पुरुष तर, २३ टक्के महिलांचा समावेश आहे.
-तंबाखूच्या सेवनामुळे कॅन्सर होण्याची शक्यता ८० टक्के
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) तंबाखूच्या सेवनामुळे कॅन्सर होण्याची शक्यता ८० टक्के असते. तर तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता ४० टक्के असते.
- देशात दरवर्षी १३.५ लोकांचा तंबाखूमुळे मृत्यू देशात तंबाखूमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. भारतात १५ वर्षांवरील १३.५ लाख लोक तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यू होतो.
-२०२५ मध्ये तंबाखूच्या कॅन्सरचे ४ लाखांवर रुग्ण
‘आयसीएमआर’च्या अहवालानुसार, २०२०मध्ये तंबाखूशी संबंधित कॅन्सरचे ३ लाख ७७ हजार ८३० प्रकरणांची नोंद झाली होती. २०२५ मध्ये यात वाढ होऊन ४ लाख २७ हजार २७३ पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे.
-तंबाखू सेवनाचे अनेक दुष्परिणाम
तंबाखूच्या सेवनाने मानवी शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. भारतात तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात प्रामुख्याने तोंडाचा, ओठाचा, जबड्याच्या, फुफुसाचा, घशाचा, पोटाचा, किडनीचा व मूत्राशयाचा कॅन्सर होतो. तंबाखूमुळे छातीत दुखणे, हृदयविकार झटका येणे, रक्तवाहिन्याचे विकार इत्यादी रोगही जडतात. धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत जी व्यक्ती धूम्रपान करते तिला हृदयरोग व पक्षाघात होण्याची शक्यता तिप्पटीने वाढते.
-डॉ. करतार सिंग, संचालक आरएसटी कॅन्सर हॉस्पिटल