खर्रा खाणाऱ्यास कोरोना झाल्यास अधिक भयावह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 10:56 AM2020-03-16T10:56:49+5:302020-03-16T10:58:34+5:30
खर्रा, तंबाखू, पान, गुटखा खाणाऱ्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्यास कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थुंकी व शिंकण्यामुळे कोरोनाचा प्रसार होत आहे. नागपुरात रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खर्रा, तंबाखू, पान, गुटखा खाणाऱ्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्यास कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
राज्याच्या या उपराजधानीत मोठ्या प्रमाणावर पानठेले आहेत. त्याचबरोबर या शहरात खर्रा, तंबाखू, गुटखा खाणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. पान मसाले, गुटखा यांवर सरकारने बंदी घातली असली तरी बहुतांश पानठेल्यावर गुटखा, पान मसाले सर्रास मिळतात. सध्या कोरोनामुळे समाजातील सर्वच स्तरात काळजी घेतली जात असताना गुटखाबहाद्दरांचा हा शौक नागपूरकरांचा जीवावर उठण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हे गुटखाबहाद्दर खर्रा, पान, तंबाखू खाऊन रस्त्यात कुठेही थुंकतात अशावेळी या पैकी एखाद्या व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर कोरोनाचे विषाणू सर्वत्र पसरण्याची भीती आहे. महापालिकेने तसेच संबंधित यंत्रणांनी वेळीच या प्रकाराची दखल घेऊन या गुटखाबहाद्दरांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
खर्रा, पान खाऊ न थुंकणाऱ्यांवर कारवाई
महापालिकेला सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा घाण करणे यासाठी दंड करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाते. रस्त्यावर थुंकून घाण करणाºयांच्या विरोधात महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने पुन्हा एकदा जोरदार मोहीम सुरू केली आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे लोकांच्या आरोग्याला घातक आहे. त्यामुळे कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मागील १३ दिवसात शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी थुंकणाऱ्या १३७ जणांना दंड आकारण्यात आला. ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकून घाण करू नये.
- डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) महापालिका
पानटपऱ्या बंद करणे अशक्य
शाळा व महाविद्यालय बंद करण्याच्या आदेशाप्रमाणे पानटपऱ्या बंद करण्याचे वरिष्ठांकडून आदेश नाहीत. शिवाय कायद्यानुसार पानटपऱ्या बंद करता येत नाही. प्रतिबंधित तंबाखू, सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आणि दंड आकारण्याचे विभागाला अधिकार आहे. अनेक ठिकाणी पानाची विक्री होते. बंद करणे शक्य नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्याचे कोणतेही आदेश नाहीत. लोकांनी रस्त्यांवर थुंकू नये.
- शरद कोलते, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन.