ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा आज वर्धापन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:23 AM2019-11-12T00:23:26+5:302019-11-12T00:23:59+5:30
कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर मंगळवारी १२ नोव्हेंबरला ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २० व्या वर्धापन दिनाचा सोहळा होत आहे. या निमित्त ओगावा सोसायटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर मंगळवारी १२ नोव्हेंबरला ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २० व्या वर्धापन दिनाचा सोहळा होत आहे. या निमित्त ओगावा सोसायटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वाजता जपान येथील प्रमुख विविध बुध्द विहारातील प्रमुख भदंत व भिक्षुसंघाच्या उपस्थितीत विशेष बुद्धवंदना व धम्मदेसना होईल. अध्यक्षस्थानी जपानमधील जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय निचिरेन-शु फेलोशिप असोसिएशनचे प्रमुख भदंत कानसेन मोचिदा राहतील. जपान येथील प्रमुख विविध २८ बुद्ध विहारातील प्रमुख भदंत व भीक्षु संघ तसेच जपान येथील बौध्द प्रतिनिधीसुध्दा उपस्थित राहणार आहेत.
येथील कॅम्पसमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. विपश्यना मेडिटेशन केंद्रात नियमित ३ व १० दिवसांचे शिबिर घेतले जाते. दर पौर्णिमेला एक दिवसीय शिबिर घेण्यात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्रामध्ये वर्षभर अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल, तसेच दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्रही सेवेत आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा समावेश दीक्षाभूमी, चिचोली येथील शांतिवन सोबत बुध्दिष्ट टुरिस्ट सर्किटमध्ये करण्यात आला आहे.
ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या दानदात्या नोरिको ओगावा यांना या कार्यक्रमात अभिवादन केले जाणार आहे. या समारंभासाठी जपान येथील भिक्षु संघाचे ११ नोव्हेंबरला आगमन झाले आहे.