आज देशाला बौद्ध धम्माची नितांत गरज : भदंत संघसेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 09:31 PM2018-10-17T21:31:25+5:302018-10-17T21:32:11+5:30
तथागत गौतम बुद्धांनी दिलेला करुणा व मैत्रीचा संदेश स्वीकारणारे जगभरातील देश आज विकास व प्रगतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे देशातील एकूणच परिस्थिती पाहता देशाला आज खऱ्या अर्थाने बुद्धाच्या धम्माची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय महाबोधी मेडिटेशन सेंटर लेह लद्दाख व जम्मू काश्मिरचे प्रमुख भदंत संघसेना यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तथागत गौतम बुद्धांनी दिलेला करुणा व मैत्रीचा संदेश स्वीकारणारे जगभरातील देश आज विकास व प्रगतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे देशातील एकूणच परिस्थिती पाहता देशाला आज खऱ्या अर्थाने बुद्धाच्या धम्माची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय महाबोधी मेडिटेशन सेंटर लेह लद्दाख व जम्मू काश्मिरचे प्रमुख भदंत संघसेना यांनी केले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस कामठी येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, भिक्खूनी मायाआॅन कातायामा (जपान), भदंत एम. मेधंकर (श्रीलंका), भदंत सयोडो शिरींघ (म्यानमार), भदंत थीच नाट टू (व्हिएतनाम), भदंत सोबिता (नेदरलँड), भदंत उपालडेल नामग्याल (तिबेट), भदंत प्रमहा अनेक उदोम धम्मकित्ती आणि आमदार मिलिंद माने प्रमुख अतिथी होते.
यावेळी ‘जागतिक शांती व मानव कल्याणाकरिता बौद्ध धम्माची’ आवश्यकता या विषयावर परिसंवाद पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने अनुयायांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य अॅड. सुलेखा कुंभारे यांनी केले. वंदना भगत यांनी आभार मानले. बरीएम जिल्हाध्यक्ष अजय कदम , दीपंकर गणवीर, नंदा गोडघाटे, रेखा भावे, रजनी लिंगायत, उदास बन्सोड, नारायण नितनवरे, देवचंद डांगे, मोरेश्वर पाटील, स्नेहलता गजभिये आदी उपस्थित होते.