आज ऋषिकेश असता तर...; अश्रूंनी भिजलेला अपूर्ण निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 10:17 AM2019-05-29T10:17:05+5:302019-05-29T10:17:42+5:30
अभ्यासात हुशार आणि खेळातही ‘ग्रॅन्डमास्टर’. बुद्धिबळाच्या पटावर तर तो स्वत:च ‘वजीर’ बनून उतरायचा. मात्र ‘कूलर’च्या माध्यमातून त्याचा काळ आल अन् आयुष्याच्या डावात नियतीने त्याचा घात केला.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लहानपणापासून त्याचे एकच स्वप्न...‘एरोनॉटिकल इंजिनिअर’ बनून त्याला आयुष्याच्या अवकाशात उंच कर्तृत्वझेप घ्यायची होती. अभ्यासात हुशार आणि खेळातही ‘ग्रॅन्डमास्टर’. बुद्धिबळाच्या पटावर तर तो स्वत:च ‘वजीर’ बनून उतरायचा. मात्र ‘कूलर’च्या माध्यमातून त्याचा काळ आल अन् आयुष्याच्या डावात नियतीने त्याचा घात केला. क्षणात होत्याचे नव्हते झाले. विद्यार्थ्यांसाठी निकाल एक टप्पा पूर्ण करून नवीन सुरुवात घेऊन येतो. मात्र ७३ टक्के गुण प्राप्त करूनदेखील त्याचा हा निकाल मात्र एक ‘अधुरी’ कहाणीच ठरला. महाल येथील ऋषिकेश आमले याचा निकाल एका क्षणासाठी घरच्यांच्या वेदनांवर फुंकर घालून गेला. मात्र दु:खाचा पहाडच कोसळला असल्यामुळे त्याचा निकाल हा वेदनादायी अश्रूंनी भिजणाराच ठरला. सर्वांसाठी हा एक मोठा धक्काच होता. सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला ऋषिकेश बारावीची परीक्षा दिल्यानंतर ‘जेईई-अॅडव्हान्स’च्या तयारीला लागला होता.
विशेष म्हणजे त्याने ‘जेईई-मेन्स’ ही परीक्षादेखील ‘क्रॅक’ केली होती. क्रिकेटची तर त्याला विशेष आवड होती व बुद्धिबळाचा तो राज्यपातळीवरील खेळाडू होता. बारावीनंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याचा सराव सुरू होता. मात्र कूलरमध्ये पाणी भरताना ‘शॉक’ लागला आणि सर्वांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले.
निकाल लागला अन् भावनांचा बांध फुटला
निकालाच्या दिवशी आमले कुटुंबीय सकाळपासूनच काहीसे अस्वस्थ होते. शेतकरी असलेले वडील रामराव, आई शोभा, ‘आयटी इंजिनिअर’ असलेल्या नम्रता व अमृता या बहिणी यांच्यासाठी हा परीक्षेचाच काळ आहे. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंगळवारी निकाल जाहीर झाला आणि सर्वांच्याच भावनांचा बांध फुटला. आमच्या ऋषीची स्वप्ने मोठी होती आणि त्यांची पूर्तता करण्याची क्षमता आणि विश्वास त्याच्यात होता. सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारा ऋषी आज असता तर...असे बोलताना बहीण नम्रता हिच्या मनातील कालवाकालव बरेच काही सांगून गेली.