"आज राजकारणात एकमेकांचे शत्रू असल्यासारखं वागतात, पण.."; फडणवीसांचं महत्वाचं विधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 01:23 PM2023-02-18T13:23:47+5:302023-02-18T13:25:14+5:30
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या राजकारणाबाबत बोलताना जवाहरलाल दर्डा यांच्याबाबत घडलेल्या एका प्रसंगाची आठवण यावेळी सांगितली.
नागपूर-
ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तसेच ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नागपुरात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या राजकारणाबाबत बोलताना जवाहरलाल दर्डा यांच्याबाबत घडलेल्या एका प्रसंगाची आठवण यावेळी सांगितली.
"जवाहरलाल दर्डा बाबूजींचे वसंतराव नाईक यांच्यासोबत चांगले संबंध होते. पण पुढे जाऊन काही कारणास्तव जेव्हा वेगळं व्हावं लागलं तेव्हा अत्यंत सुशीलतेनं एक अग्रलेख लिहिला. 'ऋणानुबंधाच्या तुटल्या गाठी' अशा मथळ्याचा अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखातही बाबूजींनी वसंतराव नाईक यांची स्तुती केली होती. विचारानं वेगळे झालो आहोत. पण मनानं नाही अशा भावना त्यातून त्यांनी व्यक्त केल्या होत्या. आजच्या राजकारणात हे यासाठी महत्वाचं आहे. कारण आज अनेकवेळा पक्षामध्ये आणि पक्षाबाहेर लोक एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात. पण राजकारणात आपला फक्त वैचारिक विरोध असतो. व्यक्तिचा विरोध नसतो. हीच परंपरा बाबुजींनी पाळली. त्यामुळेच पक्षाच्या पलिकडे जाऊन समाजात त्यांची सर्वस्तरांतील लोकांमध्ये लोकप्रियता होती", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अनेकदा हेड ऑफ टाईम्स जसं म्हणतो तसं लोकमत आपल्याला पाहत आलंय. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजीटल सर्व प्रकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत 'लोकमत' पोहोचलाय. 'लोकमत'मध्ये काम करणारी आज तिसरी पिढी तयार झालीयं. यावेळी त्यांनी जवाहरलाल दर्डा यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाचाही उल्लेख केला. लोकमतची परंपरा जी बाबूजींनी सुरू केलीय ती अविरत सुरू राहावी, हे त्यांचं स्वप्न साकार करत आज खऱ्या अर्थाने त्याच सिद्धांतावर काम करतेय, असंही फडणवीस म्हणाले.
नागपूरच्या रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात लोकमतच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या महासोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.