नागपूरजवळील मोवाडचा आज काळा दिवस; २०४ लोकांना मिळाली होती जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 05:48 PM2022-07-30T17:48:21+5:302022-07-30T17:53:59+5:30
एकाच रात्री वर्धा नदीला आलेल्या महापुराने मोवाडला होत्याचे नव्हते केले होते. आज या घटनेला ३१ वर्षे लोटली. परंतु जर पूर हा शब्द जरी उच्चारला तरी मोवाडवासियांच्या अंगावर शहारे उभे राहतात.
सुरभी शिरपूरकर
नागपूर : ३० जुलै १९९१ ची ती पहाट.... आजपासून ठीक ३१ वर्षांपूर्वीची गोष्ट... नागपूर जिल्ह्याच्या मोवाड येथे ३१ वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात २०४ नागरिकांचा मृत्यू झाला होता. आज या घटनेला ३१ वर्षे पूर्ण झाली असली तरी जखमा मात्र आजही ताज्या आहेत. आजपर्यंत या गावाने असंख्य महापूर पाहले. परंतु १९९१ च्या महापुराने असंख्य वेदना आणि आठवणी आजही कायम आहे. नदीच्या काठावरील १२ गावांवर वर्धा नदी कोपली होती. या नदीत २०४ जणांना जलसमाधी मिळाली होती. मोवाडवासी आजचा दिवस काळादिवस म्हणून पाळतात.
रात्रभर सलग झालेल्या तुफान मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत होते. दिवस उजडण्या आधीच संपूर्ण मोवाड गाव जलमग्न झाले होते. कुणालाही सावरण्याची संधी सुद्धा मिळाली नव्हती. त्यादिवशी पाहिल्यांदा मोवाडवासीयांनी वर्धा नदीचे रोद्ररूप बघायला मिळाले होते. त्यानंतर या गावाने अनेक पूर अनुभवले आहेत. मात्र १९९१ च्या महापूराने दिलेल्या असंख्य वेदना आजही कायम आहेत. खवळलेल्या नदीने हजारोंच्या डोळ्यादेखत आपल्या स्नेही जणांना महापुराने कवेत घेत असल्याचे दृश्य आजही अनेकांच्या मनात ताजे आहे.
एकाच रात्री वर्धा नदीला आलेल्या महापुराने मोवाडला होत्याचे नव्हते केले होते. वर्धा नदीच्या काठावर वसलेल्या १२ गावांवर वर्धा नदी कोपली होती. या घटनेत मोवाड येथील २०४ जणांना गिळंकृत केले होते. आज या घटनेला ३१ वर्षे लोटली. परंतु जर पूर हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर शहारे उभे राहतात.
मोवाड नगरपालिकेची स्थापना १७ मे १८६७ ला झाली. त्याला १५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर मध्यप्रदेशच्या सीमेवर मोवाड गाव नरखेड तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर आहे. येथील नगरपरिषद, स्वातंत्र्य संग्रामांचा इतिहास, चलेजाव आंदोलन खूप प्रसिद्ध होते. मोवाडचा विणकरांची मोठी बाजारपेठ होती, सोबातचं इथली बैलबाजार देखील प्रसिद्ध आहे. येथे संत्रा आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असे, मात्र महापुराच्या त्रासदीनंतर आज मोवाडमध्ये सर्व काही बदलेले आहे.
महापूरामुळे जीवनाची घडी बिस्कटल्याची खंत लोकांच्या चेहऱ्यावर दिसून येते. या विनाशाला तब्बल ३१ वर्षे पूर्ण होत असल्याने काळाने झडप मोवाडवासीयांवर घातली आणि निष्पाप २०४ लोकांना जलसमाधी मिळाली. म्हणून ३० जुलै रोज शनिवार काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो. ती काळरात्र वैऱ्याची ठरली. मृतदेहाचा सडा तीन - चार किलोमीटर पर्यंत पडला होता. प्राणहाणी, वित्तहाणी मोठ्या प्रमाणात झाली होती, आरडा-ओरड आणि किंचाळ्याने आसमंत दणाणले होते. क्षणात संपूर्ण गाव नेस्तनाबूत झाले.