उद्याचा दिवस ‘लोक’मताचा, पोलिंग पार्टी रवाना, मतदारांमध्ये उत्सुकता
By आनंद डेकाटे | Published: April 18, 2024 02:14 PM2024-04-18T14:14:11+5:302024-04-18T14:17:58+5:30
lok sabha election 2024 : वंचितचे शंकर चहांदे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता २७ उमेदवार मैदानात आहेत.
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे तयार आहे. निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण २६ उमेदवार नशीब आजमावत असून यात भाजपचे नितीन गडकरी, काँग्रेसचे विकास ठाकरे, बसपाचे योगेश लांजेवार, बीआरएसपीचे विशेष फुटाणे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण २८ उमेदवार होते. यापैकी वंचितचे शंकर चहांदे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता २७ उमेदवार मैदानात आहेत.
वंचितने येथे अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना समर्थन दिले आहे. यासोबतच शिवसेना (शिंदे ) कडून राजू पारवे, काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे, बसपाचे संदीप मेश्राम, बीआरएसपीचे ॲड. भीमराव शेंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी ६ वाजता मतदानाला सुरुवात होईल. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी नवमतदारांमध्ये विशेष उत्साह असल्याचे चित्र आहे.
निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याअगोदरपासूनच नागपूरचे राजकीय वातावरण तापले होते. प्रचारादरम्यान विविध पक्षांच्या नेत्यांनीदेखील नागपुरात उपस्थिती लावून जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांना साद घातली. याशिवाय सर्वच उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने प्रचार करत मतदानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मतदानाच्या दिवशीदेखील उमेदवार व राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे.
मतदार संघावर नजर
नागपूर
उमेदवार : २६
मतदार : २२,२३,२८१
मतदान केंद्र : २१०५
रामटेक
उमेदवार : २८
मतदार : २०,४९,०८५
मतदान केंद्र : २४०५नागपूरमध्ये २२ लाख २३ हजार २८१ मतदार
नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण २२ लाख २३ हजार २८१ मतदार आहेत. यामध्ये ११ लाख १३ हजार १८२ पुरुष मतदार आहेत. तर ११ लाख ९ हजार ८७६ महिला मतदार आहेत. यासोबतच २२३ तृतीयपंथी मतदार आहेत.
रामटेकमध्ये २० लाख ४९ हजार ८५ मतदार
रामटेक लोकसभा मतदार संघात एकूण २० लाख ४९ हजार ८५ मतदार आहेत. यापैकी १० लाख ४४ हजार ८९१ मतदार हे पुरुष मतदार आहेत. तर १० लाख ४ हजार १४२ मतदार हे महिला मतदार आहेत. यासोबतच ५२ तृतीयपंथी मतदार आहेत.