आज किस डे : प्रेमाचे, मायेचे, आपुलकीचेही माध्यम चुंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:45 AM2020-02-13T00:45:05+5:302020-02-13T00:48:01+5:30
आज ‘किस डे’... व्हॅलेन्टाईन आठवड्याचा सहावा आणि प्रत्यक्ष प्रेम दिनापूर्वीचा महत्त्वाचा दिवस. दिनाच्या सरताक्षणी पश्चिमेकडे मावळतीला जाणारा सूर्यबिंब जेव्हा धरणीचे एक दीर्घ चुंबन घेतो तेव्हा आभाळही लाजेने लालबुंद होते. रोजचीच असते ही क्रिया... पण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिनाच्या सरताक्षणी पश्चिमेकडे मावळतीला जाणारा सूर्यबिंब जेव्हा धरणीचे एक दीर्घ चुंबन घेतो तेव्हा आभाळही लाजेने लालबुंद होते. रोजचीच असते ही क्रिया... पण प्रेमाचे, समर्पणाचे आणि उगवतीला पुन्हा भेटण्याचे भाव त्यात असतात. किस अर्थात चुंबन म्हटले की केवळ प्रणयाची भावना नाही, त्यात प्रियकराच्या प्रेमाचे, आईच्या मायेचे, वडिलांच्या अभिमानाचे, विजयी आनंदाचे, उत्साह आणि समर्पणाचाही आविष्कार घडविणारे असते. आज ‘किस डे’... व्हॅलेन्टाईन आठवड्याचा सहावा आणि प्रत्यक्ष प्रेम दिनापूर्वीचा महत्त्वाचा दिवस.
चुंबन म्हणजे प्रेमाच्या अभिव्यक्तीचे शाश्वत माध्यम. याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियकरावर प्रेमाचा वर्षाव करू शकता. हा तोच पहिला गोड स्पर्श होय, ज्यातून प्रेमभावनेची जाणीव निर्माण होते. रोझ डे पासून सुरू झालेला प्रेम दिनाचा प्रवास प्रेमीयुगलांसाठी तसा आनंददायी असतोच. या प्रवासात प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे असे टप्पे येतात. या प्रत्येक टप्प्यातून प्रेमाचे वेगवेगळे प्रतिबिंब प्रियकर प्रेयसीपुढे उलगडतो. पण किस डेला त्यांच्या भावनांची उत्कटता खऱ्या अर्थाने प्रेयसी आणि प्रियकराला कळते. त्या अर्थाने हा दिवस प्रेमीयुगुलांसाठी खासच म्हणावा. हो, पण त्याला केवळ प्रणयाचे माध्यम आणि संधी समजू नका. ती एक पवित्र भावना असते, तुमच्या समर्पणाची आणि पवित्रतेचीही, तेव्हाच प्रेमाला अर्थ असतो.
तशी सार्वजनिक स्थळी चुंबनाने प्रेम व्यक्त करणे पाश्चात्य देशात सामान्य बाब असली तरी भारतात मात्र ही बाब खासगी बेडरूमपुरती मर्यादित आहे. मात्र बॉलिवूडच्या चित्रपटातील चुंबनदृश्यांनी त्याला सार्वजनिकच केले असून तरुणाई आता पुढे गेलेली आहे आणि उद्यानात ती व्यक्त करायलाही मागेपुढे पाहत नाही.
पण चुंबनाला केवळ प्रेमीयुगुलांच्या भावनांचे माध्यम समजू नका. ते आईच्या मायेचे आणि वडिलांच्या अभिमानाचेही प्रतीक आहे. शतक मारल्यानंतर सचिन आपल्या हेल्मेटचे चुंबन घेताना, सानिया मिर्झा तिच्या ट्रॉफीचे चुंबन घेताना आठवते तुम्हाला. एखाद्या खेळाडूच्या विजयी उत्साहाचीही भावना चुंबनातून व्यक्त होते. हाताचे चुंबन घेऊन भेटण्याचे आणि फ्लाइंग किस करून चाहत्यांचे अभिवादन करण्याचे साधनही चुंबनच होय. मग चुंबन म्हणजे केवळ प्रेमीयुगुलांचेच प्रेम व्यक्त करण्याची गोष्ट नाही, हे जाणलेच असेल तुम्ही. मग व्हॅलेन्टाईन आठवड्याचा ‘किस डे’ साजरा करायला काय हरकत असावी?