आज कोजागरी पौर्णिमा व महालक्ष्मीपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 07:10 AM2021-10-19T07:10:00+5:302021-10-19T07:10:01+5:30
Nagpur News मंगळवार, १९ ऑक्टोबर रोजी सर्वत्र कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.
नागपूर : मंगळवार, १९ ऑक्टोबर रोजी सर्वत्र कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.
चातुर्मासात येणाऱ्या अश्विन महिन्यात विजयादशमीनंतर येणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हटले जाते. ही पौर्णिमा शरद ऋतूमध्ये येत असल्याने शरद पौर्णिमा म्हणूनही या तिथीची ओळख आहे.
कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्याचा आकारही मोठा दिसतो. याच दिवशी लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरली होती तर काही मान्यतेनुसार याच दिवशी महालक्ष्मी देवीचा जन्म झाला आणि समुद्रमंथनाच्या दिवशी लक्ष्मी देवी भूतलावर प्रकट झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, या दिवशी लक्ष्मी-नारायणाचे पूजन करण्याची परंपरा आहे.
कृषी संस्कृतीमध्येही अश्विन पौर्णिमेचे विशेष महत्त्व असून, या दिवशी लक्ष्मी-नारायण गरुडावर आरूढ होऊन पृथ्वीवर येतात, लक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवताही स्वर्गातून पृथ्वीवर येतात, अशी मान्यता असल्याने या दिवशी दूध आटवून त्याचा नैवेद्य लक्ष्मीला दाखविला जातो आणि उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. त्यामुळेच अश्विन पौर्णिमेला कोजागर्ती असेही म्हटले जाते.
या दिवसाचे आरोग्यदायी महत्त्वही सांगितले जाते. दमा किंवा अस्थमासारख्या आजारांवरील औषधे दुधामध्ये मिसळून कोजागरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जातात. चंद्राचे किरण दुधात पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि हे दूध म्हणा वा खीर आजारी व्यक्तीला दिल्यास त्याला आराम मिळतो, असेही मानले जाते.
...........