National Inter-religious conference in Nagpur : आज नागपुरातून जगभरात जाणार धार्मिक सद्भावनेचा संदेश, ‘लोकमत’ तर्फे राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 06:46 AM2021-10-24T06:46:35+5:302021-10-24T07:45:43+5:30
National Inter-religious conference in Nagpur : धार्मिक सौहार्दाच्या जागतिक आव्हानांवर धर्माचाऱ्यांच्या उपस्थितीत महामंथन; ‘लोकमत’ तर्फे राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन
नागपूर : ‘ लोकमत ’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘धार्मिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर या परिषदेमध्ये विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत महामंथन होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून जगभरात धार्मिक सद्भावनेचा संदेश जाणार आहे. (To celebrate the golden jubilee year of its Nagpur edition, Lokmat Media Group is organising a National Inter-Religious Conference in Nagpur on Sunday, October 24, 2021)
नागपूर ‘ लोकमत ’ च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यापैकी हे पहिले मोठे आयोजन असून, ग्रेट नाग रोडवरील कविवर्य सुरेश भट सभागृहात रविवारी सकाळी ९.३० वाजता होणाऱ्या या आंतरधर्मीय परिषदेला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे, तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व महापौर दयाशंकर तिवारी हे सन्माननीय अतिथी असतील.
‘ दी आर्ट ऑफ लिव्हिंग ’ चे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर, हरिद्वार येथील पतंजली योगपीठाचे संस्थापक स्वामी रामदेव, नवी दिल्ली येथील अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी, अजमेर शरीफ दर्ग्याचे गद्दी नशिन हाजी सईद सलमान चिश्ती, मुंबईच्या जीवन विद्या मिशनचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै, मुंबईचे आर्चबिशप कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेसियस, लेह-लद्दाख येथील महाबोधी आंतरराष्ट्रीय तपसाधना केंद्राचे संस्थापक भिख्खू संघसेना, बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे धर्मगुरु ब्रह्मविहारी स्वामी हे या परिषदेत मार्गदर्शन करतील.
ब्रह्मविहारी स्वामी हे परिषदेसाठी अमेरिकेतून आले आहेत. ‘ लोकमत ’ एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, ‘लोकमत’चे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा हे देखील यावेळी उपस्थित राहतील.
धर्माचार्यांचे आगमन : या परिषदेत सहभागी होण्यासाठी धर्माचार्यांचे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे शिष्य व भक्तगण उपस्थित होते. नागपूरहून जगभरात धार्मिक सद्भावनेचा प्रसार होईल, असा विश्वास धर्माचार्यांनी व्यक्त केला. श्री श्री रविशंकर यांचे आगमन रविवारी होणार आहे.
परिषदेचे मौलिक महत्त्व
- जागतिक पातळीवर धर्माच्या नावाखाली लोकांना लक्ष करण्यात येत असताना भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशाची भूमिका महत्त्वाची ठरते.
- भारताचा ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा मंत्र जगात पोहोचावा, या निमित्ताने नागपुरातून विश्वबंधुत्वाचा संदेश व प्रेम-शांती-धार्मिक सौहार्दाचा संदेश जगभर जावा, जागतिक बंधुभावाला बळकटी मिळावी, हा या परिषदेचा उद्देश आहे.
- जगात धार्मिक सौहार्द व शांतता प्रस्थापित करण्यासाठी देश काय योगदान देऊ शकतो, याची उत्तरे शोधण्याचाच प्रयत्न या महामंथनातून होणार आहे.