नागपुरातील शिवमंदिरांमध्ये आज ‘ओम नम: शिवाय’चा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 10:56 AM2018-02-13T10:56:01+5:302018-02-13T11:00:28+5:30
महाशिवरात्रीच्या पर्वावर शहरातील विविध मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंदू धर्मातील एक पवित्र सण म्हणजे महाशिवरात्री. भगवान महादेवाच्या विशेष उपासनेसाठी महाशिवरात्रीची ख्याती आहे. जीवनातील दु:ख, अडचणी, पाप, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी यादिवशी महादेवाची भक्तिभावाने उपासना केली जाते. असा हा देवाधिदेवाच्या आराधनेचा पर्व आज १३ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्त शहरातील विविध मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विनाशाची देवता म्हणूनही भोलेशंकराची ख्याती असून, महाशिवरात्रीच्या पर्वावर दहनघाटावरही शिवआराधनेच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
विदर्भ महादेव टेकडी
श्री शिवशंकर देवस्थान विदर्भ महादेव टेकडी, खसरमारी, वर्धा रोड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजता गिरीश पांडव यांच्या हस्ते भगवान शिवाचा लघुरुद्र अभिषेक व महापूजा करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ११ पासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता सप्तखंजेरीवादक तुषार सूर्यवंशी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल. १५ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता विदर्भातील ४५ भजन मंडळाच्या दिंडीयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आसपासच्या परिसरात फिरून दुपारपर्यंत मंदिरात दिंडीचा समारोप होईल. त्यानंतर दहीहंडी, गोपालकाला व महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होईल.
शिवशक्ती भजन मंडळ
शिवशक्ती भजन मंडळ यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. याअंतर्गत १३ व १४ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम मंदिर, रामनगर येथे हा शिवआराधनेचा उत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता बिल्वार्चन, ९ वाजता लघुरुद्र अभिषेक आणि सायंकाळी ६ वाजता भजनांचा कार्यक्रम होईल. १४ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल.