आज चंद्र येणार पृथ्वीच्या जवळ; २७ ला सुपर पिंक मून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 07:30 AM2021-04-26T07:30:00+5:302021-04-26T07:30:02+5:30
Nagpur News Super Pink Moon २७ एप्रिल रोजी अवकाशात विलोभनीय घटना पाहायला मिळणार आहे. चैत्र पौर्णिमेची ही सुपरमून पौर्णिमा राहणार असून वर्षातील पहिला सुपरमून असेल. यावेळी चंद्र १४ टक्के मोठा आणि ३० टक्के तेजस्वी दिसेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २७ एप्रिल रोजी अवकाशात विलोभनीय घटना पाहायला मिळणार आहे. चैत्र पौर्णिमेची ही सुपरमून पौर्णिमा राहणार असून वर्षातील पहिला सुपरमून असेल. यावेळी चंद्र १४ टक्के मोठा आणि ३० टक्के तेजस्वी दिसेल. पौर्णिमा २७ तारखेला असली तरी २६ ते २८ हे तीन दिवस चंद्र जवळजवळ पूर्ण दिसेल. या काळात चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर ३,५८,६१५ कि.मी. असेल, अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाॅच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
प्रत्येकवर्षी सुपरमूनचे वेळेस चंद्र-पृथ्वीमधील अंतर कमी-अधिक होत असते. यावर्षीचे पृथ्वी-चंद्र सर्वाधिक कमी अंतर २६ मे रोजी होणाऱ्या सुपरमूनच्यावेळी राहणार आहे. २६ जानेवारी १८४८ रोजी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ आला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०१६ ला आला होता. आता २७ एप्रिल आणि २६ मे रोजी होणारे सुपरमून हे देखील खूप कमी अंतराचे राहील. परंतु पृथ्वी आणि चंद्रातील सर्वाधिक कमी अंतर हे २५ नोव्हेंबर २०३५ रोजी असेल, तर ६ डिसेंबर २०५२ रोजी शतकातील सर्वात मोठे सुपरमून होणार आहे.
पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज नाही
सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगविताना मोठ्या आकाराचा दिसेल. पौर्णिमेला तो तुळ राशीत असेल. सुपरमून पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नाही, परंतु दुर्बिणीला फिल्टर लावून त्यावरील विवर पाहता येतील. यावेळेस चंद्र आकाराने मोठा आणि खूप तेजस्वी दिसणार असल्याने या खगोलीय घटनेचा अभ्यासकांनी आनंद घ्यावा. कोरोना संकट आणि संचारबंदी असल्याने घरूनच सुपरमून पाहावा, असे आवाहन स्काय वॉच ग्रुपतर्फे चोपणे यांनी केले आहे.
...