सकल मराठा समाजाचा आज नागपूर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 12:17 AM2018-08-09T00:17:53+5:302018-08-09T00:19:03+5:30
आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने ठोक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर बंदची हाक दिली आहे. समाजाची १६ टक्के आरक्षणाची मागणी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने ठोक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर बंदची हाक दिली आहे. समाजाची १६ टक्के आरक्षणाची मागणी आहे.
आंदोलनाची सुरुवात गुरुवारी सकाळी ९.३० वाजता गांधीगेट, महाल येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाआरतीने होणार आहे. आरतीनंतर बंद आंदोलनाला सुरुवात होणार आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये, याकरिता व्यापारी संघटना आणि लोकांनी मोर्चाला सहकार्य करावे तसेच व्यापाऱ्यांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावीत, असे समाजाने आवाहन केले आहे. मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून समाजाने जिल्हाधिकारी, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, एसटी महामंडळ, व्यापारी संघटनांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. समाजबांधव प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करणार आहे. यादिवशी जवळपास २५ हजार समाजबांधव आणि महिला रस्त्यावर उतरून आंदोलन आणि चौकाचौकात जाऊन युवक शासनाविरोधात निदर्शने करणार आहेत. मोर्चाला भावसार, हलबा युवा समाज, मुस्लीम परिषदेसह अनेक समाजाने पाठिंबा दिला आहे.
शाळांना सुटी जाहीर
ठोक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश शाळांनी गुरुवारी सुटी जाहीर केली आहे. शाळा व्यवस्थापनाने सुटीचे संदेश पालकांना मोबाईलवर पाठविले आहेत. काही शाळांनी विद्यार्थ्यांना अनौपचारिक सुटी दिली आहे. शिक्षण विभागाने अधिकृत सुटी जाहीर केलेली नसून शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपल्या अधिकारात सुटी दिली आहे. या दिवशी शाळांमध्ये शिक्षक हजर राहतील, पण विद्यार्थी येणार नसल्यामुळे वर्ग भरणार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.