आज व्हॅलेंटाइन डे : रंग प्रेमाचा, उधळण प्रीतीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 11:43 PM2020-02-13T23:43:44+5:302020-02-13T23:45:01+5:30

आपल्या सहवासाला व कृतीला पावित्र्य असल्याची खात्री असायला हवी, यातून जवळीक वाढावी, स्नेहबंध जुळावेत आणि एका उदात्त, पवित्र भावबंधनाचे नाते निर्माण व्हावे. हाच खरा ‘व्हॅलेंटाईन डे’चा संदेश आहे.

Today is 'Valentine's Day': love of color, love of warmth | आज व्हॅलेंटाइन डे : रंग प्रेमाचा, उधळण प्रीतीची

आज व्हॅलेंटाइन डे : रंग प्रेमाचा, उधळण प्रीतीची

googlenewsNext
ठळक मुद्देतऱ्हा बदलली, भावना तीच : कुठे ‘नेट-भेट’ तर कुठे थेट ‘हाल ए दिल’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मन:पटलावरील अस्पष्ट जाणिवांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाइन डे’, १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंटाईन डे’ मानला जातो, ‘व्हॅलेंटाईन’ या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रेमाचा संदेश पाठविणारा मंत्र किंवा भेटकार्ड मग ते आई-वडिलांपासून बहीण-भावंडे, मित्र-मैत्रिणी कुणालाही पाठविलेला असो, एवढा उदात्त हेतू असूनही अलीकडे आपणच त्याला विकृत स्वरूप दिले आहे. सध्या या दिवसाला फक्त रोमँटिक डे एवढेच स्वरूप आले आहे. प्रेमभावनेच्या ऊर्जेचा अपव्यय न होता जीवनप्रवाह अधिक चांगला होण्यासाठी याचा उपयोग व्हायला हवा, मनाच्या प्रीतिपाकळ्या अलगदपणे उलगडत जात असताना त्या चुरगळल्या जाणार नाहीत, याचा विश्वास पक्का व्हायला हवा. आपल्या सहवासाला व कृतीला पावित्र्य असल्याची खात्री असायला हवी, यातून जवळीक वाढावी, स्नेहबंध जुळावेत आणि एका उदात्त, पवित्र भावबंधनाचे नाते निर्माण व्हावे. हाच खरा ‘व्हॅलेंटाईन डे’चा संदेश आहे.
एक काळ होता जेव्हा मंदिरात जायचा बहाणा करून ती भेटायला यायची. ‘मै तुझसे मिलने आयी मंदिर जाने के बहाने’ असेच तिचे सांगणे असायचे. मात्र त्यावेळी युवांमध्ये एवढा बोल्डनेस नव्हता. त्यामुळेच की काय कॅन्टीन असो की क्लासरूम! वर्गात कसे तो आणि ती दूर-दूर बसायचे. ट्युशनमध्ये त्याने तिच्याकडे बघितले की इतर सारे शंकेने बघायचे. एकमेकांच्या ट्युशन सुटण्याच्या वेळेत दोघेही बाहेर उभे राहायचे. हळूच दबकत-दबकत मग सायकल नाही तर लुनाच्या चिमट्यात फुलं खोचायचे. सर्वांच्या पुढ्यात नजरा चुकवून बघणे ‘आँखो ही आँखो’ मे काहीतरी व्हायचे. आता जमाना ‘व्हॉटस्अ‍ॅप’चा आहे. त्यामुळे ‘तू है की नही...’असे न म्हणता थेट ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर दिवसभर ‘नेट-भेट’ करण्यावर भर असतो.
तेव्हा व्यक्त करण्याची ई-माध्यमे फारशी नव्हती. मोबाईल एसएमएसचे पॅक आकर्षक व्हायचे होते. ‘आॅर्कुट’ जेमतेम आले होते, मात्र ‘फेसबुक’ची बूम नव्हती. आता झपझप बदल झाले.काही संघटना विरोध करतात म्हणून प्रेमदिन नाहीसा झाला नाही. संवादाची गरज‘युनिव्हर्सल’ असल्याने प्रेम आहेच आहे टिकून! बदल एवढाच झाला की वर्षभरातून एकदा येणारा प्रेमदिन आता अनेकांसाठी रोजचाच झालाय! व्हीआयपी रोड घ्या की फुटाळ्याची चौपाटी, याचे प्रत्यंतर वर्षभर आपणासही येईलच! आपण रोजच जगतो तरी वाढदिवस असतोच ना? तसाच हा प्रेमदिन! हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!

गुरुवारीच प्रियकर-प्रेयसींची भेट : विरोध करणाऱ्यांचा मनस्ताप टाळला
व्हॅलेंटाईन डे १४ तारखेला असला तरी अनेक कपल्सनी तो गुरुवारी १३ च्या सायंकाळीच उरकून घेतला, तर काहींनी १५ तारखेला फिरायला जाण्याचे ‘प्रॉमिस’ केले आहे. ‘दिल की दिल से बात’ झाली आहे... जरा माहोलच तसा आहे... १४ ला तेच दरवर्षीचे टेन्शन... सगळीकडेच धुमाकूळ... पोलिसांची करडी नजर... नकोच! व्हॅलेंटाईन डे साजरा होणार आहे, पण जरा सेफली!
‘रक्षकांची’ दहशत आणि तरुणाईला फुटलेले पंख अशा परिस्थितीत ‘व्हॅलेंटाईन डे’ शनिवारी साजरा होत आहे. अंबाझरी, जपानी उद्यान, तेलंगखेडी, महाराजबाग, सेमिनरी हिल्स ही ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याची मनपसंत ठिकाणं. दरवर्षी एखादी संघटना किंवा पक्षाकडून ‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोधाचा फतवा निघतो आणि त्यामुळे प्रेमवीरांचे ‘टेन्शन’ वाढते. विरोधाची शक्यता लक्षात घेता, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या आदल्या दिवशी गुरुवारी बहुसंख्य युगुलांनी शहरातील महत्त्वाच्या उद्यानात गर्दी केली होती. महाविद्यालयातही नेहमी असणारी विद्यार्थ्यांची संख्या आज रोडावलेली असल्याचे चित्र होते. अनेकांनी तर थेट मॉल्स व रेस्टॉरंट गाठले होते.
यातील काही युगुलांशी चर्चा केली असता प्रसाद-तृप्ती या जोडीने सांगितले की, उद्यानात प्रेमीयुगुलांना मारहाण करण्याच्या घटना काही वर्षांपासून घडत आहेत. नागपुरात अशी घटना घडली नसली तरी कशाला हवा मनस्ताप म्हणून एक दिवस अगोदरच हा दिवस साजरा करण्याचा बेत आखला. विशेष म्हणजे गुलाबाची फुलेही स्वस्त आहेत. प्रवीण-पायल या युगुलांनी सांगितले की, उद्या हिला घरून निघणे कठीण आहे. तसेच कसेतरी भेटलो तरी अनेकांच्या नजरा युगुलांकडे पाहण्याच्या वेगळ्या असतात. ते नकोच म्हणून आजच भेटण्याचा बेत आखला.

 

Web Title: Today is 'Valentine's Day': love of color, love of warmth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.