आज जागतिक उच्च रक्तदाब दिन; योग्य जीवनशैली आत्मसात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 10:25 AM2018-05-17T10:25:57+5:302018-05-17T10:26:05+5:30

उच्च रक्तदाब म्हणजेच हायपर टेन्शन; हे तीन व्यक्तींमधून एकामध्ये याची लक्षणे आढळून येतात. चोर पावलांनी येणारा हा आजार जगाच्या आरोग्यासमोरचे आव्हान ठरत आहे.

Today the world hypertension day; Improve life style | आज जागतिक उच्च रक्तदाब दिन; योग्य जीवनशैली आत्मसात करा

आज जागतिक उच्च रक्तदाब दिन; योग्य जीवनशैली आत्मसात करा

googlenewsNext
ठळक मुद्दे९.४ दशलक्ष मृत्यू ‘हाय ब्लड प्रेशर’ने

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च रक्तदाब म्हणजेच हायपर टेन्शन; हे तीन व्यक्तींमधून एकामध्ये याची लक्षणे आढळून येतात. चोर पावलांनी येणारा हा आजार जगाच्या आरोग्यासमोरचे आव्हान ठरत आहे. दरवर्षी वेळेच्याआधी मृत्यूमुखी पडणाऱ्या ९.४ दशलक्ष लोकांच्या मृत्यूला हाच आजार कारणीभूत ठरत आहे. या व्याधीला दूर ठेवायचे असेल तर योग्य जीवनशैली आत्मसात करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
उच्च रक्तदाब हा आजार नाही. पण होणाऱ्या आजाराची चाहूल मात्र नक्की म्हणता येईल. उच्च रक्तदाब ही तक्रार आजच्या धावपळीच्या जीवनशैलीची सामान्य बाब होऊ पाहते आहे.
सर्वसाधारणपणे १२० ते १३० ही रक्तदाबाची वरची पातळी सामान्य मानली जाते, तर ८० ते ९० ही खालची पातळी नॉर्मल रक्तदाबामध्ये गणली जाते. रक्तदाब हा व्यक्तीच्या वयानुसार, कामाच्या स्वरूपानुसार आणि काही प्रमाणात अनुवांशिकतेवर अवलंबून असतो. रक्तदाबाची वरची पातळी ही व्यक्तीचं वय अधिक १०० मिळून येणारा आकडा नॉर्मल धरला जातो. उदा. ४५ वय असणाऱ्या व्यक्तीसाठी १४० ते १५० ही वरची पातळी नॉर्मल मानली जाते. अशा वयाच्या व्यक्तीमध्ये १६० या पातळीच्यावर रक्तदाब गेल्यास तसेच खालची पातळी ९५ पेक्षा अधिक दिसून आल्यास त्या व्यक्तीस उच्चरक्तदाब असण्याची शक्यता असते.

रक्तदाब का वाढतो?
उच्च रक्तदाब दोन प्रकारचा असू शकतो. पहिला म्हणजे रक्तदाब वाढण्यामागे एखाददुसरा आजार दडलेला असतो. अशावेळी उच्च रक्तदाब हे लक्षण दीर्घकाळ टिकून राहणारं असतं.
परंतु काही परिस्थितीमध्ये काही विशिष्ट काळापुरताच रक्तदाब वाढलेला आढळतो. उदा. अचानक बसलेला मानसिक धक्का, भीती, गर्भारपण हे रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरतं.
कित्येक वेळा आपला रक्तदाब आता मोजला जाणार या भीतीनेदेखील काही व्यक्तींमध्ये रक्तदाब वाढलेला आढळून येतो. डॉक्टरांच्या केबिनमध्ये पाऊल ठेवताच तात्पुरता वाढलेला रक्तदाब आणि मोजण्याच्या नुसत्या कल्पनेनं वाढलेला रक्तदाब फसवा असू शकतो. या फसव्या उच्च रक्तदाबाला व्हाईटकोट हायपरटेन्शन असं म्हणतात.
याशिवाय शरीरांतर्गत असलेल्या काही आजारांमध्ये रक्तदाब वाढलेला दिसतो. मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळा येणं, मूत्रपिंडाला आतून सूज येणं, मूत्रपिंडाना होणाऱ्या रक्तपुरवठ्यात काही दोष निर्माण होण्यासारख्या प्रकारात मूत्रपिंडावरील ताण वाढून रक्तदाब वाढतो.
शरीरभर रक्ताचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये दोष निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो. उदा. रक्तवाहिन्यांना काठिण्य येणं. परिणामी शरीराच्या रक्ताभिसरणामध्ये अडथळा येऊन त्याचा ताण हृदयावर पडत रक्तदाब वाढतो.
याशिवाय शरीरातील कार्य सुरळीत चालू रहावे यासाठी आवश्यक असणाऱ्या संप्रेरकांमध्ये बिघाड झाल्यास रक्तदाब वाढलेला दिसतो.
कोणत्याही कारणाने मेंदूभोवती असणारा दाब वाढल्यास त्याचा परिणाम रक्तदाबावर होतो.
धावपळीची जीवनशैली, ताणतणाव, व्यायामाचा अभाव, बंद पाकिटातील अन्न सेवन, सिगरेट, तंबाखू, दारूचे व्यसन, अपुरी झोप, अपुरी विश्रांती ही कारणेदेखील रक्तदाब वाढण्यात कारणीभूत ठरतात.

रक्तदाब वाढला तर...
तात्पुरता रक्तदाब वाढल्यास त्याचा शरीरावर कोणताही गंभीर परिणाम होत नाही. परंतु सतत उच्च रक्तदाबामुळे महत्त्वाच्या अवयवांना इजा होऊ शकते. हृदयाचा आकार वाढणे, हृदयाच्या भागात वेदना होणे, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या कामात बिघाड होणे आणि परिणामी हृदय कमकुवत होणे, यासारखे परिणाम उच्च रक्तदाबामुळे थेट दिसून येतात.
उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडाच्या कार्यात बाधा निर्माण होणे, अतिउच्च रक्तदाबामुळे मेंदू भोवतीच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता निर्माण होते.
उच्चरक्तदाबाचा ताण डोळ्यातील रक्तवाहिन्यांवरदेखील दिसून येतो. रक्तदाब नियंत्रणाअभावी डोळ्यात रक्तस्राव होऊन दृष्टी अधू होण्याची शक्यता दिसून येते.

Web Title: Today the world hypertension day; Improve life style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य