आज देशात शेतकरी, शास्त्रज्ञांना कुणी विचारत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:07 AM2021-07-02T04:07:32+5:302021-07-02T04:07:32+5:30

नागपूर : वसंतराव नाईक यांनी आयुष्यभर शेतकरी आणि शास्त्रज्ञांचा हात सोडला नाही. मात्र आज देशातील शेतकरी आणि शास्त्रज्ञांना कुणी ...

In today's country, no one asks farmers and scientists | आज देशात शेतकरी, शास्त्रज्ञांना कुणी विचारत नाही

आज देशात शेतकरी, शास्त्रज्ञांना कुणी विचारत नाही

Next

नागपूर : वसंतराव नाईक यांनी आयुष्यभर शेतकरी आणि शास्त्रज्ञांचा हात सोडला नाही. मात्र आज देशातील शेतकरी आणि शास्त्रज्ञांना कुणी विचारत नाही, अशी खंत कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी यांनी व्यक्त केली.

वसंतराव नाईक फाऊंडेशन आणि वनराई फाऊंडेशनच्या वतीने माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रयोगशील शेतकरी पुरस्कार-२०२१ धीरज जुनघरे यांना प्रदान करण्यात आला. या समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी होते. राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे निवृत्त संचालक डॉ. एम. एस. लदानिया, आमदार निलय नाईक प्रामुख्याने उपस्थित होते.

समारंभादरम्यान काटोल तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी धीरज जुनघरे यांना २१ हजार रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती जुनघरे यांनी संक्षिप्त मनोगत व्यक्त करताना या पुरस्काराने आपली जबाबदारी वाढल्याची भावना व्यक्त केली.

डॉ. मायी म्हणाले, मोसंबी आणि संत्र्याच्या उत्पादनात नव्या तंत्राचा वापर करून शेतामध्ये नवनवे प्रयोग करणाऱ्यांसाठी जुनघरे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. स्व. वसंतराव नाईक यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. त्यांनी नवे कृषी तंत्र आणले. तंत्रज्ञान सामान्यांपर्यंत पोहचविणारी यंत्रणा विकसित केली. आज देशाचे कृषी उत्पादन २३० मिलियन टनावर पोहचले आहे. उत्पादन वाढले पण मूल्य वाढले नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे.

आमदार निलय नाईक प्रास्ताविकात म्हणाले, शेती, माती आणि पाण्यावर नाईक साहेबांचे नितांत प्रेम होते. आधुनिकीकरणावरही त्यांचा भर होता. मुंबईच्या आधुनिकीकरणाची पायाभरणी त्यांनी केल्याने मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

डॉ. लदानिया यांनी धीरज जुनघरे यांनी शेतात शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या कलमांच्या लागवडीची आणि वापरलेल्या तंत्राची माहिती दिली. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनीही समारंभाच्या पूर्वार्धात हजेरी लावून मनोगतातून आदरांजली वाहिली. गिरीश गांधी यांनी अध्यक्षीय भाषणातून वसंतराव नाईकांच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्यात असलेला सभ्यपणा आज राजकारणात दिसत नाही. राजकारणातील काळ सभ्यतेसाठी तिष्ठत आहे, अशी भावना व्यक्त केली. संचालन डॉ. पिनाक दंदे यांनी केले तर आभार अजय पाटील यांनी मानले. विविध क्षेत्रांतील मान्यवर समारंभाला हजर होते.

Web Title: In today's country, no one asks farmers and scientists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.