आज वाजणार शाळेची पहिली घंटा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:02 AM2019-06-26T00:02:00+5:302019-06-26T00:05:04+5:30
शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरावा आणि वर्षभर विद्यार्थ्यांना शाळेची ओढ राहावी म्हणून शिक्षण विभागाने प्रवेशोत्सवाचे आयोजन केले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रवेशोत्सवाच्या नियोजनाची तयारी पूर्ण करणार आहे. यात विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार आहे सोबतच गोडजेवणसुद्धा राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरावा आणि वर्षभर विद्यार्थ्यांना शाळेची ओढ राहावी म्हणून शिक्षण विभागाने प्रवेशोत्सवाचे आयोजन केले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रवेशोत्सवाच्या नियोजनाची तयारी पूर्ण करणार आहे. यात विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार आहे सोबतच गोडजेवणसुद्धा राहणार आहे.
प्रवेशोत्सवाची तयारी मुख्याध्यापकांना एक दिवसापूर्वीच करायची होती. शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घ्यायची, शाळा परिसराची स्वच्छता, सुशोभिकरण करायचे होते. बहुतांश जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मंगळवारी शाळेत पोहचून दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली. पहिल्या दिवशी सर्व शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रभातफेरी काढायची आहे. यात गावकरी, युवक व लोकप्रतिनिधींना सहभागी करायचे आहे. प्रभातफेरीनंतर सर्व विद्यार्थ्यांना पुष्प देऊन स्वागत होणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे. माध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना गोड पदार्थ देण्यात येणार आहे. १०० टक्के शाळा भेटी होण्याच्या दृष्टिकोनातून विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. शाळा भेटी करून वर्गनिहाय पटसंख्या व गणवेश योजनेची तालुकानिहाय विद्यार्थीसंख्या विभागास सादर करायची आहे.
गणवेशाविनाच पहिला दिवस
समग्रच्या बजेटमधून जिल्ह्याला त्यांच्या वाट्याचा गणवेशाचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, अद्यापपर्यंत तो निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग झालेला नाही. गणवेशाची डीबीटी रद्द केल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीस गणवेशाचे अनुदान वितरित करण्यात येईल. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून गणवेश खरेदी, शिलाई करणे अपेक्षित आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी तरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण अशक्यच असल्याचे दिसून येत आहे.
दप्तरमुक्त शाळा
शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंदी जावा म्हणून शहरातील काही शाळांनी दप्तरमुक्त शाळा ठेवली आहे. शिवाय अर्धवेळ शाळा घेण्यात येणार आहे. पहिल्यांदा शाळेत येणाऱ्या मुलांसाठी वर्गखोल्या सजविण्यात आल्या आहे. मुलांना चॉकलेट व काही गिफ्टसुद्धा देणार आहे. पहिल्या दिवशी मुलांची ओळख व परिचय करवून घेतल्या जाणार आहे. त्यांच्यासोबत शिक्षण उन्हाळ्यातील सुट्यांचे अनुभव शेअर करणार आहे.
मनपा शाळांची वेळ एक तासाने वाढली:दर्जा सुधारण्यावर भर
महापालिकेच्या शाळा २६ जूनपासून सुरू होत आहे. पुढील शैक्षणिक सत्रात शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आधी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या दरम्यानची वेळ होती. पुढील सत्रात सकाळी १० ते सायंकाळी ५ यादरम्यान शाळा चालणार आहेत. महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. शाळेची वेळ वाढल्याने शिक्षकांची ओरड सुरू झाली आहे.
दरम्यान, इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. परंतु गणवेशाबाबत अद्याप स्पष्टता नाही. पहिल्या दिवशी गणवेश मिळणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. यावर अधिकाऱ्यांनी मौन धारण केले आहे. वास्तविक १५ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले होते. मात्र विभाग उदासीन असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेचाही गणवेश वाटपाला फटका बसला आहे.
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार मनपा शाळांत गेल्या वर्षी १६,५०० विद्यार्थी होते. पुढील सत्रात विद्यार्थ्यांची संख्या वाढते की कमी होईल, याबाबतची स्थिती शाळा सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे खासगी शाळांतील प्रवेश प्रक्रिया याआधीच पूर्ण झाली आहे.