‘सुपरमध्ये’ आज पहिले किडनी प्रत्यारोपण
By admin | Published: February 9, 2016 02:56 AM2016-02-09T02:56:07+5:302016-02-09T02:56:07+5:30
बहुप्रतीक्षेत असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मंगळवारी पहिले किडनी प्रत्यारोपण होत आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांत हे पहिले केंद्र ठरणार आहे.
आईकडून मुलीला मिळणार जीवनदान!
नागपूर : बहुप्रतीक्षेत असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मंगळवारी पहिले किडनी प्रत्यारोपण होत आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांत हे पहिले केंद्र ठरणार आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून ही शस्त्रक्रिया होत आहे. विशेष म्हणजे, या प्रत्यारोपणातून एका तरुणीला जीवनदान मिळणार आहे. तिला तिच्याच आईकडून किडनी दिली जाणार आहे.
राज्यातील हजारो रु ग्ण डायलिसिसवर जगत आहेत. यातील शेकडोहून अधिक रु ग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. याला घेऊनच नागपूर मेडिकल प्रशासनाने पुढाकार घेत सुपर स्पेशालिटी रुग्णालयांत किडनी प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दीड वर्षांपासून याची तयारी सुरू होती. जानेवारी महिन्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तयारीला वेग आला होता. मंगळवारी पहिले प्रत्यारोपण होत आहे. एका २४ वर्षीय युवतीवर हे प्रत्यारोपण होणार आहे. ही युवती गेल्या १० वर्षांपासून किडनी आजाराने ग्रस्त होती. तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने ती डायलिसीवर जगत होती. तिला तिच्या आईनेच किडनी दान केली आहे. सर्व कायदेशीर प्रक्रियांमधून तिच्या आईने तिला आपली एक किडनी दिली आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व सुपर स्पेशालिटीचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनात नेफ्रोलॉजीस्ट डॉ. कोलते यांच्या नेतृत्त्वाखाली डॉ. धनंजय सेलूकर, डॉ. समीर चौबे, डॉ. चारुलता बावनकुळे, डॉ. मनीष बलवानी हे या किडनी प्रत्यारोपणासाठी सहकार्य करणार आहेत. उद्या सकाळी होणारी ही शस्त्रक्रिया तीन तासांवर चालणार आहे. एकाच वेळी आईची किडनी काढून मुलीमध्ये प्रत्यारोपण केले जाईल.(प्रतिनिधी)