आज 'हग डे' : त्राण दूर करणारी 'जादू की झप्पी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 01:07 AM2020-02-12T01:07:17+5:302020-02-12T01:07:50+5:30
भावनेला मोकळीक करवून देणारा आणि अबोल कृतीतून सारे काही सांगणारा आज ‘हग डे’ अर्थात ‘आलिंगन दिवस’ आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाषेचा तो फरक आहे आणि त्यामुळे त्यात गमतीही आहेत. आता हेच बघा ना, इंग्रजीतील ‘किस’ हा शब्द जेवढा सहज वाटतो, तेवढाच मराठी किंवा हिंदीमधील त्याच अर्थाने ‘चुंबन’ म्हटले की अवघडल्यासारखे होते. इंग्रजीमध्येच ‘सेक्स’ हा शब्द अश्लील, उग्र भावना निर्माण करतात आणि त्याच अर्थाने मराठी किंवा हिंदीमध्ये ‘प्रणय’ हा शब्द सोज्वळ, भावनाप्रधान वाटतो. अर्थ तेच, मात्र एका भाषेतील भावनेला असणाऱ्या शब्दाला दुसऱ्या भाषेत मिळणारा अर्थ भिन्न असल्याने, या गमती असतात. अशीच गंमत ‘व्हॅलेंटाईन विक’मधील ‘हग डे’ या शब्दाची आहे. मराठी किंवा हिंदीमध्ये या शब्दाचा तंतोतंत अर्थ विश्लेषण करून सांगायला नको! पण, इंग्रजीतील याच शब्दाचा मराठी किंवा हिंदी अर्थ दिलासा देणारा आहे, भावनेला मोकळीक करवून देणारा आणि अबोल कृतीतून सारे काही सांगणारा आहे. आज ‘हग डे’ अर्थात ‘आलिंगन दिवस’
मानवाच्या प्रत्येक कृतीला गहिवर असतो, गांभीर्य असते. भावना जेव्हा उत्कट होतात, तेव्हा सहजगत्या घडणाºया कृतीला संवेदनेची झालर असते. नवजातक आपल्या मातेच्या छातीला सतत चिकटून असतो. जरा दूर केले की तो नवजात ‘क्वॅ क्वॅ’ रडतो, जणू दोघांचीही हृदयगती एकमेकांशी सतत संवाद घालत असतात. दूर होताच, त्या संवादात खंड पडतो आणि शब्दांचा अभाव असलेल्या त्या नवजातकाच्या उरातून निघणारी ती ओरड आर्जवी असते. त्या नि:शब्द आर्जवाचा अर्थ ‘ये आई मला तू अशीच कवटाळून धर ना’ हा आपण सहजगत्या समजून घेतो. याचा अर्थ भावना जेव्हा निरागस होतात, तेव्हा त्या कवटाळण्याचे, आलिंगनाचे महत्त्व स्पष्ट होते. आलिंगनाची कृतीच निराळी आहे. ‘व्हॅलेंटाईन विक’मध्ये रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे साजरे झाले. हे सगळे विशिष्ट भावना साजरे करणारे दिवस असले तरी ‘प्रेम’ या प्रक्रियेला पूर्णत्व प्रदान करण्याच्या या पायºया आहेत. प्रेमात निर्माण होणाºया प्रत्येक भावनांशी हे दिवस निगडित आहेत. त्याच प्रक्रियेत येणारा ‘आलिंगन’ या कृतीचे महत्त्व ‘हग डे’मधून प्रतिपादित होते.
मेंदू जड व्हायला लागतो, हृदयाचा थरकाप उडतो आणि मन अस्थिर व्हायला लागते, तेव्हा आपण निर्विकार झालेलो असतो. स्वत:ला शून्यत्वाची प्रचिती होण्याचा क्षणच! जणू आपण नवजातक झालेले असतो आणि एखाद्या खंबीर हृदयाचा आधार शोधत असतो. ही अत्यंत पवित्र भावना असते आणि म्हणून सहजच आपल्या अगदी विश्वासाच्या व्यक्तीला आलिंगन देऊन काही क्षण निवांत राहावे, असे वाटत असते. शून्यत्वातून पुन्हा एकदा नवे अंकगणित सुरू व्हायला लागते. म्हणूनच ‘आलिंगन’ महत्त्वाचे ठरते. यालाच मुन्नाभाईच्या भाषेत ‘जादू की झप्पी’ म्हणूयात. मग काय देणार ना ‘जादू की झप्पी’.