नागपूरच्या रामनगर येथील पादुका भवनाचे आज लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:33 AM2019-03-10T00:33:28+5:302019-03-10T00:34:28+5:30
रामनगर येथील जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाच्या ‘योगाभ्यासी पादुका भवन’ चे लोकार्पण १० मार्च रोजी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामनगर येथील जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाच्या ‘योगाभ्यासी पादुका भवन’ चे लोकार्पण १० मार्च रोजी होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे स्वरवेध प्रस्तुत भक्तिसंगीताचा कार्यक्रम होईल.
शनिवारी सकाळी ६ वाजता साधकांकडून योगाभ्यास व वास्तुशांती करण्यात आली. त्यानंतर सकाळी ९ वाजता वास्तुशांती पुजा करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मोठ्या संख्येने साधक व भक्तांनी श्री जनार्दनस्वामीच्या प्रतिमेचे व पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी प्रामुख्याने मंडळाचे कार्यवाह राम खांडवे गुरुजी उपस्थित होते. त्याचबरोबर अध्यक्ष सुनील सिर्सीकर, सहकार्यवाह मिलिंद वझलवार, अनिल नाजपांडे, वसंत नानेकर, डॉ. दिनेश बापट, राहुल कानिटकर, रवि वाघमारे, प्रशांत राजूरकर, संजय लष्करे, वसंत देवगडे, स्वप्निल भोसकर, सतीश एलकुंचवार आदींचे सहकार्य लाभले.
पादुका भवनाची रचना
९३७५ चौरस फुट जमिनीवर २० हजार चौरस फुटाची ही पाच माळ्याची इमारत आहे. योगाभ्यासासाठी तीन मोठे कक्ष बनविण्यात आले आहे. स्वामींची प्रतिम व पादुकांच्या समोर बसुन नामस्मरण व ध्यान करण्यासाठी १४०० चौरस फुटाचे सभागृह आहे. सोबतच कार्यालय, पुस्तक व अन्य योग साहित्य वितरण केंद्र तयार करण्यात आले आहे. इमारतीत पब्लिक अॅड्रेस सिस्टीम व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. जलव्यवस्थापन यंत्रणा लावण्यात आली आहे. स्त्री व पुरुषांसाठी योगाभ्यास, धारणा, ध्यान आदीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. राजस्थानातील दगडांचा उपयोग करून भवनाला मंदिराचे रुप देण्यात आले आहे.